राष्ट्रवादीला धक्का : तारळे गावचे सरपंच प्रकाश जाधव अपात्र
पाटण । तारळे (ता.पाटण) येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच प्रकाश दिनकर जाधव यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हा निकाल दिला आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी- भाजप यांची युती तुटली असून आता तारळेत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजपाची युती निर्माण झाली आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पाटणकर गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, तारळे ग्रामपंचायतीत 8 फेब्रुवारी 2021 रोजी नवीन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य यांनी एप्रिल 2022 मध्ये मनमानी कारभाराबाबत तक्रारीचे निवेदन दिले होते. त्या निवेदनाच्या अहवालानुसार 4 मे रोजी चौकशी समितीची नियुक्ती केली होती. या चौकशी समितीने प्राथमिक अहवालानुसार सरपंच प्रकाश जाधव यांनी कर्तव्यात कुसुर केल्याचे म्हटले होते. सातारा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 10 फेब्रुवारी 2023 रोजी अंतिम अहवाल सादर केला होता.
त्यानुसार सरपंच यांनी गैर व बेकायदेशीर कामे करणे, कामात कुसूर, हलगर्जीपणा, ग्रामपंचायत मासिक ठरावात खाडाखोड करणे. विकास कामांच्या निविदा योग्य पद्धतीने न काढता, सर्व कामे जवळच्या लोकांना, नातेवाईक यांना आर्थिक फायदा करता देणे. आर्थिक व्यवहारात खोटी कागदपत्रे, जुन्या तारखेची बिले देणे. सरपंचांच्या सांगण्यावरून ग्रामसेवकांनी मासिक सभेमध्ये खाडाखोड करणे, आर्थिक बाबींचे ठराव नंतर करणे अशा तक्रारी असल्याचे म्हटले आहे.
देसाई गट आणि भाजप एकत्र
प्रकाश जाधव भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीतून सरपंच झाले होते. यावेळी राष्ट्रवादीचे- 6, भाजप- 4, देसाई गट- 7 अशी सदस्य संख्या निवडूण आलेली होती. तेव्हा भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्रित येत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला दूर ठेवले होते. आता देसाई गट आणि भाजप यांनी राज्यातील फार्म्युला तारळेत राबवत राष्ट्रवादीला दूर केले आहे. राष्ट्रवादीच्या विद्यमान सरपंचाला आता अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.