राष्ट्रवादीचा झेंडा कपाळावर सारखाच ठेवू का? : अजित पवार
मुंबई | मी ट्विटरवर असलेलं उपमुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ट्विटमधील काढलं. बाकीचे आहे तसंच आहे परंतु त्यामधूनही लोक गैरसमज करून घेतात. आता झेंडा सारखाच कपाळावर ठेवू, तसं काही झालं असलं तर मी स्वतः सांगेन. तुम्हांला जोतिष्याची गरज नाही. कोणीतरी बातम्या पेरण्याचे काम विघ्नसंतोषी लोक करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्या घेवून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, आमच्या पक्षातील प्रवक्ते आमची भूमिका मांडतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. तेव्हा पासून आम्ही काम करत आहोत, जो पर्यन्त जीवात जीव आहे, तो पर्यन्त राष्ट्रवादीचे काम करीत राहील असेही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.
मी कुठल्याही आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मी भाजपला पाठिंबा देणार नाही आणि तशी शक्यताही वर्तवली नाही. या संदर्भातील ज्या बातम्या पेरल्या जात आहे, त्याच्यातून आमचे कार्यकर्ते नाराज होतात. त्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नका असेही आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले आहे.