सिंकदर शेखने इराणच्या अलीला नागपट्टीवर डावावर दाखवले अस्मान

कराड | सुर्ली (ता. काड) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात भारताचा युवा मल्ल महान भारत केसरी सिकंदर शेख याने इराणचा तगडा मल्ल अली इराणीला नागपट्टीवर डावावर पराभवाची धूळ चारून प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले. सुर्ली येथील यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने कुस्ती मैदानाच्या आयोजन करण्यात आले होते.
सिकंदर शेख विरूद्ध अली इराण ही कुस्ती खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, विश्वास हारुगले, धनाजी पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ, नवनाथ पाटील, सरपंच दत्तात्रय वेताळ यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. चुरशीने झालेल्या लढतीत अलीने सिकंदरचे सर्व हल्ले परतावून लावले. सिकंदरने अलीचा दुहेरी पट काढून तावा मिळवत नागपट्टी डावावर त्याला पराभवाची धूळ चारली. सिकंदरच्या विजयामुळे कुस्ती शौकिनांनी जल्लोष केला. सुपनेच्या दिग्विजय जाधव याने पंजाबच्या कमलजित याला वरचढ होऊन देता पोकळगीचा डावावर मात केली.
कुस्तीच्या मैदानात बकासूर बैलाची थाटात एंन्ट्री
सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथील बैलगाडी शर्यतीत रुस्तुम ए हिंद किताब विजेता बकासुर बैलाची एन्ट्री सुर्लीच्या कुस्ती मैदानात होताच उपस्थित कुस्तीशौकिनांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. बकासुरला पाहण्यासाठी कुस्तीशौकिनांनी मोठी गर्दी केली होती. प्रथम क्रमांकाची कुस्ती बकासुरच्या उपस्थितीत लावण्यात आली. या वेगळ्या उपक्रमाची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.