कराड बाजार समितीच्या कामाबाबत शेतकऱ्यांच्यात नैराश्य : डाॅ. अतुल भोसले
पाल येथे शेतकरी विकास पॅनेलचा प्रचार शुभारंभ

कराड | स्वातंत्र्यपूर्व काळात कराड कृषि उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाली. बाजार समितीत ज्या पध्दतीने काम करायला पाहिजे त्या पध्दतीने केले नाही. गुळ, भाजीपाला यांना योग्य पध्दतीने भाव मिळत नसल्याने बाजार समितीच्या कामकाजाबाबत शेतकऱ्याच्यात नैराश्य निर्माण झाली असल्याची टीका शेतकरी विकास पॅनेलचे नेते डाॅ. अतुल भोसले यांनी केली.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने “शेतकरी विकास पॅनेल” चा प्रचार शुभारंभ पाल (ता. कराड) येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे माजी आ. आनंदराव पाटील, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डाॅ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा कारखान्याचे व्हा.चेअरमन जगदीश जगताप, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, यानंद पाटील, पै. धनंजय पाटील, सुहास बोराटे, प्रशांत यादव, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
डाॅ. अतुल भोसले म्हणाले, स्व. पी. डी. पाटील यांच्या माध्यमातून सह्याद्री साखर कारखाना तर जयवंतराव आप्पा यांच्या माध्यमातून कृष्णा कारखाना उभा राहिला. या परिसरातील शेतकरी या कारखान्यामुळे समृध्द झाला. परंतु गूळ, भाजीपाला यासह अन्य शेती उत्पादनासाठी बाजार समितीत जावे लागते. तेथील कामाबाबत आजही शेतकऱ्याच्यांत नैराश्य आहे.