किल्ले वसंतगडच्या पायथ्याशी अंत्यसंस्कार : सुभेदार शंकर उकलीकर यांना 6 वर्षाच्या चिमुरडीने दिला भडाग्नी
तांबवे | भारत माता की जय…वीर जवान तुझे सलाम…अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे…. वन्दे मातरम् च्या…..जय घोषात… कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलामध्ये बॉम्बे इंजिनीयर ग्रुप 112 इंजिनिअर रेजिमेंट मध्ये कार्यरत असलेले नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर हे देश सेवेत कार्यरत असताना वीरगतीस प्राप्त झाले शहीद झाले. त्यांना नयना अश्रुनी वसंतगडाच्या पायथ्याशी बंधू आनंदा आणि 6 वर्षाच्या स्वराजंलीने दुपारी 4 वाजता भाडाग्नी दिला.
हुतात्मा जवान शंकर याचे पार्थिक सकाळी 11:30 वाजता कराड येथील विजय दिवस चौकात आलेनंतर मानवंदना देण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कराड नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते साैरभ पाटील, रणजित पाटील आणि विजय दिवस समारोह समितीच्या पुष्पचक्र वाहण्यात आले. यावेळी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. मार्गावर उपस्थितांकडून घोषणा देत. तेथून पार्थिव दत्त चौकातील शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करुन मुळ गाव वसंतगडकडे त्यांच्या निवासस्थानी दुपारी 1:30 वाजता पोहोचले. घराजवळ पार्थिव आल्यानंतर कुटुंबीयांनी अक्षरशः टाहो फोडला. पत्नी पूजा व आई यांचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली. या दुःखद प्रसंगी सहा वर्षाची चिमुरडी स्वराजंलीला मात्र घराजवळ एवढी गर्दी का जमली आहे, हे कळत नसल्याने ती कावरीबावरी झाली होती. घरापासून अंत्यविधी ठिकाणापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. फुलांचा वर्षाव करत शहीद जवान अमर रहे, अशा घोषणा दिल्या.
वसंतगड ग्रामपंचायत तसेच युवकांकडून सजवलेल्या वाहनातून गावातून शंकर उकलीकर याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी वसंतगड येथील वि. ग. माने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर दोन किमी रांगोळी घातली होती. ठिकठिकाणी रस्त्यावर मोठ- मोठे भावपूर्ण श्रद्धांजलीचे बोर्ड लावले होते. कोल्हापूर नाका ते वारुंजी फाटा- पाटण रोड मार्गे किल्ले वसंतगड येथे पार्थिव आणताना वांरूजी फाटा, विमानतळ, मुंढे, विजयनगर, पाडळी, केसे, सुपने, अभयचीवाडी येथे त्यांना लोकांच्याकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी कल्याणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा, प्रेमलाताई चव्हाण विद्यालय- विजयनगर, जिल्हा परिषद शाळा- विजयनगर, केदारनाथ हायस्कूल सुपनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. सातारा जिल्ह्यातील सर्व आजी/माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय ग्रामस्थ, तरुण वर्ग, एन सी सी, प्रशासकिय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर यांनी शहीद वीर जवानाच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते.
यावेळी सैन्य दलातील मेजर ए. बी. थापा, मधुकर चव्हाण, वाय. जी. वारले, लेफ्टनंट जे. एस. कदम, लेफ्टनंट अय्याप्पा, उत्तुरकर, गाडे, प्रशांत कदम, कॅप्टन मनी राम शर्मा, बाळासाहेब लांवड, लेफ्टनंट कमांडर जाधव, सुभेदार देशमुख, संतोष सुर्वे, एस. एम. शिंदे, सोपान नलवडे, सुनिल सासवे, एस. टी. यादव, बी. टी. पटवर्धन, सुभेदार अनिल मोरे, हवालदार जितेंद्र सुर्वे, शेडगे, बंडू पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून खासदार श्रीनिवास पाटील, माजी आ. आनंदराव पाटील, काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ नलवडे, सरपंच अमित नलवडे, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी परिसरातील तांबवे, सुपने , विजयनगर, अभयचीवाडी, साकुर्डी, म्होप्रे गावातील पदाधिकारी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुत्रसंचलन माजी उपसरपंच निवास शिंदे, साकुर्डी उपसरपंच विश्वास कणसे, वासु पाटील यांनी केले.
जवानाच्या बलिदानाचे तहसिल, प्रातांच्या महसूल विभागाला वावडे का?
कराड तालुक्यातील वसंतगड येथील जवान शंकर उकलीकर देशसेवा बजावताना शहीद झाले. या शहीद जवानाचा यथोचित सन्मान करण्यासाठी वसंतगड ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांनी सर्वोत्तपरी आपली भूमिका बजावली. गेले दोन दिवस वसंतगड येथील बाजारपेठ बंद ठेवत दुखवटा पाळण्यात आला. तसेच अंत्यसंस्काराची तयारी तसेच अंत्ययात्रा मिरवणूकही नियोजनबध्द काढण्यात आली. परंतु, यामध्ये प्रशासनाची भूमिका उदासीनतेची दिसून आली. कराडचे तहसिलदार, प्रांत यांचा महसूल विभागाला या जवानाच्या बलीदानाबाबत काहीच गांभीर्य नसल्याचे दिसल्याने समाजसेवक तसेच वसंतगडसह पंचक्रोशीतील नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात होता. कराड येथील विजय दिवस चाैकात किंवा वसंतगड येथे जवानाच्या अंत्यविधीची तयारी कशी आहे किंवा काय चालू आहे यांची साधी विचारपूस केली नाही. केवळ प्रातांधिकारी अतुल म्हेत्रे यांनी शासकीय पुष्पचक्र वाहण्यासाठी उपस्थिती लावल्याचे पहायला मिळाले. तर तहसिलदार विजय पवार यांचे पूर्णच दुर्लक्ष दिसून आले. मात्र, पोलिस प्रशासनाने आपली चोख भूमिका बजावल्याचे पहायला मिळाले. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर आणि पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी लोकांची गैरसोय होवू नये, यासाठी अत्यंत नियोजबध्द खबरदारी घेण्यात आली होती. संपूर्ण दिवसभर दोन्ही अधिकारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.