कराड- पाटण मार्गावरील ‘या’ गावात बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार

कराड | कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे भरवस्तीत ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बिबट्याने हल्ला केला असून 3 शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. गावात मध्यभागी असलेल्या घराच्या पाठीमागे बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असून माहिती घेत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- पाटण मार्गावर असलेल्या पश्चिम सुपने येथील शिवाजी बापू चव्हाण यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या शेडात शेळ्या बांधलेल्या होत्या. सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे घराचे पाठीमागील दार उघडले असते, तेथे शेळ्या मृत अवस्थेत दिसून आल्या. शिवाजी चव्हाण यांची परिस्थिती बेताची असल्याने घटनेची माहिती मिळताच, गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
पश्चिम सुपने गावातील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी गावच्या मध्यभागी असलेल्या ठिकाणी बिबट्यांनी हा हल्ला केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. परंतु या हल्ल्यामुळे बिबट्याचे वास्तव्य आता डोंगरापासून लांब असलेल्या पश्चिम सुपने गावात असल्याने वसंतगड, सुपने, साकुर्डी , आबईचीवाडी गावात भीतीचे वातावरण आहे.