Satara News : जितींत मध्यरात्री अज्ञातांनी 2 दुचाकी जाळल्या

कराड | जिंती (ता. कराड) येथे शुक्रवारी (दि. 1) रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरासमोर लावलेल्या दोन मोटारसायकली पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली. पुणे सारख्या शहरात मोटारसायकल पेटवण्याच्या घटना घडत असताना जिंती सारख्या ग्रामीण भागात अशी घटना घडल्याने उंडाळे विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जिंती येथील विकास सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी सावळा पाटील यांचे घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी रात्री 1 च्या सुमारास अज्ञाताकडून पेट्रोल ओतून जाळणेत आल्या. शिवाजी पाटील यांचे घर मुख्य चौकात असल्याने मोठा जाळ व गाडीची पेट्रोल टाकी फुटल्याचा आवाज झाल्याने घरातील व शेजारील लोक उठून बाहेर आले. मात्र, आगीने मोठा पेट घेतल्याने मोटारसायकली वाचवता आल्या नाहीत. दोन्ही मोटारसायकलचे फक्त सांगाडे उरले आहेत.
आकाश शिवाजी पाटील यांचे नावे असणारी (MH-50- Q -1330) हिरो होंडा व विठ्ठल सावळा पाटील हे वापरत असलेली त्याच्या नातेवाईक यांची (MH- 50- D- 2107) या मोटारसायकली आगीत जळून खाक झाल्या आहेत. या जळीतात सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असून या घटनेची फिर्याद आकाश शिवाजी पाटील यांनी कराड ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.