लग्नासाठी बोलावून युवतीसोबत 15 जणांनी केले घृणास्पद कृत्य
कराडच्या युवतीबाबत कोल्हापूरातील प्रकार

कराड | कराड तालुक्यातील एका युवतीला लग्न करण्यासाठी युवकाने कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात बोलावून त्याठिकाणी जमावाने तिला मारहाण करत तिच्याशी घृणास्पद कृत्य केले. सदरचा प्रकार गतवर्षी 16 एप्रिल 2022 रोजी घडला होता. याप्रकरणी पिडीत युवतीने 11 मे 2023 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या एका गावामध्ये घडला होता. या प्रकारानंतर युवती मानसिक तणावाखाली होती. तसेच आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड नजीकच्या एका उपनगरात पिडीत युवती आपल्या आई-वडिलांसोबत राहते. गतवर्षी 16 एप्रिल 2022 रोजी तिच्या मित्राने फोन करून आपण विवाह करूया, असे म्हणून युवतीला बोलावून घेतले. संबंधित युवती त्याच दिवशी करवीर तालुक्यातील त्या मित्राच्या घरासमोर गेली. त्यावेळी मित्रासह त्याचे अन्य नातेवाईक तेथे होते. सुमारे पंधरा जणांनी युवतीला शिविगाळ, दमदाटी करण्यास सुरूवात केली.
उपस्थित मित्र व नातेवाईकांनी तुला विवाहासाठी आम्ही बोलवले नाही, असे म्हणून त्यांनी युवतीला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिला एका शेतात नेऊन त्याठिकाणी मारहाण केली. तिच्या अंगावर पाणी, शेण, माती तसेच काटे टाकण्यात आले. काही महिलांनी युवतीचे केस पकडून तीला फरपटत नेले. शिविगाळ करुन तीला तु पुन्हा येथे यायचे नाही, असे म्हणून तिच्यासह तिच्या आई, वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पिडीत युवती गत वर्षभर मानसिक तणावाखाली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.



