फिर्यादीच निघाला चोर : कोळेतील ट्रॅक्टर चोरीचा बनाव उघड

कराड । ट्रॅक्टर चोरीप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. मात्र, ट्रॅक्टर चोरीची तक्रार देणाऱ्या फिर्यादीनेच चोरीचा बनाव केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. त्यामुळे फिर्यादीवरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कराड तालुका पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
पोलिसांनी सांगीतले की, बिघाड झाल्यामुळे कोळे येथे रस्त्याकडेला उभा केलेला ट्रॅक्टर चोरीस गेल्याची तक्रार आणे येथील रामकृष्ण बाबुराव देसाई यांनी सुमारे आठ दिवसांपुर्वी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करुन गुन्हे शाखेचे हवालदार नितीन येळवे, पोलीस नाईक सज्जन जगताप, उत्तम कोळी, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपास सुरू असताना कुसूर येथील रणजीत राजेंद्र पाटील यांचे नाव निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याकडे संबंधित ट्रॅक्टर आढळून आला. त्यामुळे आरोपी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मात्र, हा ट्रॅक्टर चोरला नसून रामकृष्ण देसाई यांच्याकडून खरेदी केल्याचे रणजीत पाटील यांनी सांगीतले. ट्रॅक्टर 4 लाख 20 हजार रुपयांना खरेदी केल्याचे रणजीत पाटील यांचे म्हणणे आहे. तसेच खरेदी झाल्यानंतर रामकृष्ण देसाई यांनी तो ट्रॅक्टर नेण्यास रणजीत पाटील यांना तोंडीच सांगीतले होते. रणजीत पाटील यांनी ट्रॅक्टर नेल्यानंतर मात्र देसाई यांनी याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चोरीला गेल्याची फिर्याद दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रामकृष्ण देसाई यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.