चांद्रयान 3 यशानंतर अंतरिक्ष आयोगाचे सदस्य राहिलेले आ. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया…

-विशाल वामनराव पाटील
अंतरिक्ष आयोगाचे सदस्य राहिलेले व इस्रोचे काम जवळून पाहिलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेनंतर शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी 2004 ते 2010 या काळात इस्त्राेचे पाहिलेल्या कामाला उजाळा दिला. तसेच चांद्रयान 3 यशामुळे जगात भारताचा दबदबा वाढणार असल्याचे म्हटले आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, चांद्रयान 3 मोहिमेचा पहिला टप्पा पार झाला असून हे फार मोठ यश आहे. चंद्रावर एक रोअर सोडून तिथले फोटो, व्हिडिअो काढायचे ही एक मोठी उपलब्धी आहे. याबद्दल इस्त्रोच्या सर्व अभियंते, इंजिनिअर, टेक्निशियन आणि मॅनेजर यांचे अभिनंदन केले. भारत 2008 साली पहिल्यांदा चंद्रावर गेला. मून मिशन कार्यक्रम होता, तेव्हा आपण भारताचा तिरंगा चंद्रावर फडकावला. तेथे शास्त्रीय उपकरण ठेवण्यात त्यावेळी यशही आले होते. चांद्रयान 1 ने चंद्रावर पाणी आहे हे सिध्द केले. चांद्रयान 2 पूर्णपणे यशस्वी झाले नसले तरी धातू असल्याचे शोधले होते. चांद्रयान 3 आता अलगदपणे चंद्रावर उतरले आहे. आता एक रोअर छोटी गाडी त्यामधून बाहेर पडेल. तेथून फोटोग्राफीला सुरूवात होईल. हवामान तपासेल, माती तपासेल मातीचे पृथ्थकरण होईल. रशियाचा अशा प्रकारचा प्रयोग फसला होता. परंतु, भारत यशस्वी ठरला, त्यामुळे आपले यश अधोरेखित होते.
भारतीय संशोधकाकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलेल
भारताची खूप मोठी उपलब्धता असून जे काही शास्त्रीय संशोधन केले आहे, ते जगातील सर्व शास्त्रज्ञांनी शेअर करतो. त्यामुळे केवळ भारताच्या नव्हे तर जगातील शास्त्रज्ञांच्या माहितीत भर पडणार आहे. अप्रत्यक्षपणे भारताचा दबदबा निर्माण होतो. ज्या प्रमाणे इंदिरा गांधी यांच्या काळात अणवस्त्राचा स्फोट केला. तेव्हा खूप लोकांनी टिका केली. परंतु, भारताकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. तसाच आताही भारतीय संशोधक, इंजिनियर यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. परदेशातील लोक एका वेगळ्या आदराने पहायला लागतील.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अंतरिक्ष आयोगाचे 6 वर्ष सदस्य
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अंतरिक्ष आयोगाचे 6 वर्ष 2004 ते 2010 या दरम्यान सदस्य राहिले असून त्यांनी अत्यंत जवळून कार्यभार पाहिला आहे. चांद्रयान 1 मोहिम त्या काळात झाल्याने अनेक शास्त्रज्ञांना ते अोळखतात. या ठिकाणावरील प्रत्येक प्रयोगशाळेला भेट दिली आहे.