कर्नाटकचा उद्या फैसला : एक्झिट पोल, सट्टा बाजारचा अंदाज काॅंग्रेसचा गुलाल

बेंगलोर | कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असे संकेत एक्झिट पोलनी दिले होते. एक्झिट पोलनी कॉंग्रेसला कमाल 100 ते 122 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता सट्टा बाजारात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळणार असल्याची पसंती दिली आहे. देशातील सहाही सट्टा बाजारांनी काँग्रेसला 125 पेक्षा अधिक जागा मिळतील; तर भाजपला अवघ्या 65 जागा मिळतील. त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, यावर सट्टा लावला जात आहे.
उद्या शनिवारी (दि. 13 मे) निकाल जाहीर होणार आहे. त्यात कॉंग्रेस 125+, भाजप 65+, तर निजदला 26 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील सट्टा बाजारांनी काँग्रेसचा गुलाल म्हटले असून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. तर कर्नाटकमध्ये जनता दल 20 ते 30 जागा मिळवेल असा अंदाज दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सर्व अंदाज फोल ठरवताना काँग्रेसला 140 जागा मिळतील आणि राज्यात काँग्रेस सत्तेवर एकहाती विजय मिळवेल असा दावा केला आहे. दुसरीकडे भाजपाचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी पोल तसेच सट्टा बाजार यांचे अंदाज फोल ठरवत भाजपच कर्नाटक राज्यात सत्तेवर येईल असे म्हटले आहे.