महाबळेश्वर- तापोळा मार्गावर दरड कोसळली, वाहतूकीवर परिणाम

सातारा । महाबळेश्वर- तापोळा परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसात महाबळेश्वर भागात पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे. आज तापोळा रस्त्यावर चिखली व हरचंदी गावाजवळ पहाटे ५ वाजता दरड कोसळली आहे, यामुळे येथील वाहतूकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वरहून- तापोळ्याला जाणाऱ्या मार्गावर आज पहाटे दरड कोसळली असल्याने वाहतूकीवर त्याचा परिणाम दिसून आला. वाहन चालक तसेच नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून सदरील माहिती दिली. सध्या या परिसरात सतत पावसाची रिपरिप सुरू असल्याने दरडी कोसळत आहेत. तेव्हा वाहनचालकांनी सावधानता बाळगून प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महाबळेश्वर भागात गेल्या पंधरा दिवसात तिसऱ्यांदा दरड कोसळल्याचा प्रकार झाला आहे. पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावर आंबनेळी घाटात दोनदा दरड कोसळली होती. त्यानंतर मेढा- महाबळेश्वर मार्गावरही दरड कोसळली होती. त्यामुळे या परिसरात पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले असून प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच पुढील काही तासात तापोळा- महाबळेश्वर मार्गावरील दरड हटविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.