हणबरवाडी- शहापूर योजनेच्या लिकेज व पंप दुरुस्तीच्या कामात दुर्लक्ष ः गुजरातहून तंत्रज्ञ येणार

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
आंदोलनामुळे हणबरवाडी- शहापूर योजना आठ दिवसांपूर्वी सुरू झाली. योजनेच्या अंतवडी येथील डिलिव्हरी चेंबरमध्ये पाणीपुरवठा सुरू झाला. त्यातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याकरिता सोडण्यात आले. दरम्यान, योजनेच्या अंतवडी पासून चिखली, किवळ बाजूस तीन ते चार ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहेत. यामध्ये चिखली- रिसवड गावच्या मध्यावर मोठे लिकेज आहे. दुसऱ्या रिसवड, वडोली, मेरवेवाडी बाजूस श्री. पवार यांच्या शेताजवळ मोठे लिकेज आहे. त्यातून पाणी वाया जात असल्याची बाब शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असताना, गेल्या चार दिवसांपासून सदर लिकेज काढण्याच्या कामात दिरंगाई होताना दिसत आहे. किंबहुना दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित ठेकेदार यांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मशिनरी विभागाचे तीन पंप दुरुस्त आहेत. विद्युत पंप दुरुस्तीसाठी गुजरात वरून तंत्रज्ञ येणार असल्याच्या वल्गना अधिकाऱ्यांच्या कडून होत आहेत.
मसूरसह परिसरातील 16 गावांना वरदान ठरणाऱ्या हणबरवाडी – शहापूर व धनगरवाडी- बानूगडेवाडी उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्णत्त्वास गेले आहे. सदर योजनेच्या टेस्टिंगचा शुभारंभ माळवाडी (मसूर) परिसरात 28 डिसेंबरला झाला होता. योजना पूर्णत्वास आली. सध्या पाऊस पूर्ण थांबलेला असून लोकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची अडचण होत आहे. अशा परिस्थितीत वारंवार मागणी करून देखील या योजनेसाठी आरक्षित पाणी उपलब्ध असतानाही योजना सुरू करण्यास टाळाटाळ करण्यात आली. म्हणून या योजनेच्या लाभक्षेत्रातील सतरा – अठरा गावांमधील शेतकऱ्यांच्या समवेत आमदार बाळासाहेब पाटील यांनी मसूरच्या मुख्य चौकात 18 ऑगस्ट रोजी आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी पालकमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. त्यांच्या सूचनेवरून 22 ऑगस्टला पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. 21 ऑगस्ट रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत आमदार बाळासाहेब पाटील यांनी मसूरच्या पूर्वेकडील गावात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याची पालकमंत्र्यांना जाणीव करून दिली. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तात्काळ पाणी सोडण्यात यावे. अशी विनंती केली.
त्यामुळे 23 ऑगस्टला हणबरवाडी-शहापूर योजनेला पाणी सोडण्यात आले होते. मात्र ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमूळे योजना बंद आहे. सदरच्या योजनेतील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून ही योजना पूर्ववत करावी अन्यथा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी दिला आहे. एकीकडे या योजनेचे पाणी शिल्लक असूनही सध्या पाण्याची गरज असताना सुद्धा पाणी शेतीला मिळत नाही. त्यातच दोन-तीन ठिकाणी मोठे लिकेज असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दहा-बारा दिवस झाले तांत्रिक बिघाड निघत नाही. याला जबाबदार कोण? असा असा सवाल संतप्त आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे. शासन अधिकारी आणि ठेकेदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे योजना बंद असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे योजनेतील पाणी असूनही शेतीला मिळत नाही, असे सध्याचे चित्र आहे.