बाजार समिती निवडणूक : खटाव- माणला भाजप विरोधात महाविकास आघाडी रान पेटणार?

खटाव | कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरु झाल्याने माण- खटाव तालुक्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर भाजपा समविचारी लोकांना सोबत घेवून बाजार समितीवर आपलाच झेंडा फडविण्यासाठी हालचाली करत आहे. त्यामुळे हायव्होलटेज ड्रामा पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. आगामी काही दिवसांवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या निवडणुकीला मोठे महत्व आले असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हालचाली वेगवान झाल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीपासून राष्ट्रवादीत पडलेल्या दुफळीचा फायदा उचलून बाजार समिती काबीज करण्यासाठी भाजपाने गळ टाकायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीनेही भाजपला एक नंबरचा शत्रू मानून चाचपणी सुरु केली आहे. त्यांची महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु झाली आहे. Market Committee Election: Mahavikas Aghadi vs BJP in Khatav-Man Taluka गेल्या निवडणुकीत 18 पैकी 17 राष्ट्रवादीचे तर एक काँग्रेसचे संचालक निवडून आले होते.
परंतु, आता बाजार समितीत परिस्थिती बदलली आहे. जिल्हा बँक निवडणूक अपक्ष लढून यशस्वी झालेले प्रभाकर घार्गे सध्या राष्ट्रवादीपासून चार हात लांब आहेत. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. जयकुमार गोरेंच्या अध्यक्षतेखाली धैर्यशील कदमांच्या कारखान्यांवर झालेल्या भाजपच्या बैठकीत घार्गे सहभागी झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसनेही वरिष्ठांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारण्याचे जवळ- जवळ निश्चित केले असल्याचे समजत आहे. त्यामुळे भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा सामना याठिकाणी रंगणार हे निश्चित दिसत आहे.
कोरेगाव मतदारसंघात येणाऱ्या खटाव, पुसेगाव, बुध भागात आ. महेश शिंदेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादीचा या भागातील गड आ. शशिकांत शिंदे सांभाळणार आहेत. आ. महेश शिंदेच्या रडावर राष्ट्रवादी नेहमीच राहिली आहे. त्यामुळे ताकद पणाला लावणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुख यांच्यासह पक्षाच्या सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रांतिक सदस्य रणजितसिंह देशमुख आणि पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते अंग झटकणार आहेत. डॉ. दिलीप येळगावकरही या निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत राहणार आहेत.