पुसेसावळी दंगलीतील दोषींना सोडणार नाही : अजित दादांचा सज्जड दम

पुसेसावळी | पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीतील दोषींना आम्ही सोडणार नाही. परंतु जातीय सलोखा राखण्यासाठी गावातील नागरिकांनी एकमेकांना आधार द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज अचानक अजित पवार यांनी पुसेसावळीत झालेल्या दोन गटातील दंगलीमध्ये मृत्यू झालेल्या नूरुल हसन शिकलगार याच्या घरी भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, माजी पंचायत समिती सभापती संदीप मांडवे,हणमंतराव शिंदे,माजी सरपंच सूरेश पाटील,माजी उपसरपंच दत्तात्रय रुद्रके, सरपंच सुरेखा माळवे, उपसरपंच डॉ.विजय कदम,चेअरमन रवी कदम, आशपाक एम बागवान, मनान पठाण,मज्जिद नदाफ, समर आतार, कराडचे विजय यादव आदिसह गवातील नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अचानक दाैरा आयोजित करण्यात आल्याने पुसेसावळीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. अजित पवार यांनी नूरूल शिकलगार यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर ज्या मस्जिदीमध्ये राडा झाला तेथेही भेट दिली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सुरेखा माळवे व इतर पदाधिकारी यांच्याशी बातचीत केली. त्यानंतर रस्त्यातच गाडीचा दरवाजा उघडून उभे राहत लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.