कराड कोर्टाचा निकाल : शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी लगट करणाऱ्यास सश्रम कारावास

कराड | शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी लगट करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणाऱ्यास तीन वर्ष सश्रम करावास आणि 40 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली. अविनाश गणेश फाटक (वय- 64, रा. निराई अपार्टमेंट, शिंदेनगर, कोयना वसाहत, मलकापूर) असे आरोपीचे नाव आहे.
सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत येथील अविनाश फाटक हा खासगी शिकवणी घेत होता. त्याठिकाणी शिकवणीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीशी त्याने लगट करून त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. मुलीने याबाबतची माहिती दिल्यानंतर पालकांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अविनाश फाटक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक टी. एस. शादीवान यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. तसेच सरकारी वकील अॅड. आर. डी. परमाज यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अविनाश फाटक याला तीन वर्ष सश्रम कारावास आणि चाळीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला अॅड. ऐश्वर्या यादव, अॅड. कोमल लाड, सहाय्यक पोलीस फौजदार ए. के. मदने, हवालदार एस. बी. खिलारे, योगिता पवार यांनी सहकार्य केले.