उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा स्वःताहून त्याग केला : आ. शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
आमची बाजू न्यायाची, सत्याची व बहुमताची आहे. सरकारला धोका नाही, सरकार भक्कम आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा उध्दव ठाकरे यांनी स्वः इच्छेने, स्वताः हून त्या पदाचा त्याग केला. त्यामुळे नविन सरकार आलं, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आमच्या सरकारला कुठलाही धोका नाही, असा दावा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
आज राज्यातील सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शंभूराज देसाई माध्यमांशी बोलत होते. पुढे श्री. देसाई म्हणाले, आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका कायद्याला, नियमाला धरूनच होती, हे आजच्या निर्णयानुसार होती. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. उध्दव ठाकरे गटाची मंडळी सांगत होती. आठ दिवसात हे सरकार जाणार म्हणत ती गोष्ट चुकीची होती, हे आजच्या निकालाने स्पष्ट झाले आहे. राऊत काय म्हणतात, याला आम्ही लक्ष देत नाही. पक्षाच्या प्रतोद पदाचा निर्णय सुध्दा विधानसभा अध्यक्षच घेतात, असे मला वाटते.
नरहरी झिरवळाचे वक्तव्य पूर्वग्रह दूषित ः- शंभूराज देसाई
विधानसभा अध्यक्ष यांनी आधीच स्पष्ट केले आहे. सर्वांना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. बहुमत विचारात घेवूनच निर्णय दिला जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले आहे. याउलट उध्दव गट म्हणत होते, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे निर्णय जाणार आहे. परंतु ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष न्याय आसनावर बसतात. त्यावेळी ते न्यायालयाच्या भूमिकेत असतात. पंरतु हे प्रकरण आपल्याकडे यायच्या अगोदर, आताचे विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी अगोदरच सांगितले होते. 16 आमदार अपात्र होणार तेव्हा झिरवळ साहेब किती आतातायीपण करतात, हे समोर आले आहे. पूर्वग्रह दूषित वक्तव्य उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले होते.