सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ विस्तार लवकरच : शिंदे गटाच्या मंत्र्याचे संकेत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शासन अगोदर पासूनच भक्कम आहे. कालच्या निकालानंतर ते आणखी मजबुत झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातारा दौऱ्यावर शनिवारी (दि. 13 मे) येत त्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई पत्रकारांशी संवाद साधत होते.
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी येत्या 20 ते 21 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल म्हटले आहे. तर आता शंभूराज देसाई यांनीही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हटल्याने इच्छुकांचा नजरा विस्ताराकडे लागल्या आहेत. मरळी- दाैलतनगर (ता. पाटण) येथे शासन आपल्या दारी या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रम संबधित आयोजित पत्रकार परिषदेत ते मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.
अनिल परब मोठे वकील, आम्ही 200 प्लस जागा जिंकू : शंभूराज देसाई
शिंदे गटाचे 16 आमदारच नव्हे तर विधानसभा अध्यक्षही अपात्र होतील. या अनिल परब यांनी केलेल्या दाव्यावर शंभूराज देसाई म्हणाले, अनिल परब फार मोठे वकील आहेत. आता ते काहीही दावा करू शकतात. त्यांना महत्व देण्याची गरज नाही. कालच्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट हे क्लियर आहे. त्यांना महत्व देत नाही. शिंदे- फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय गतिमान सुरू असून 2024 ला ही शिंदे- फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.