शिक्षक सोसायटी निवडणुक : पाटणला परिवर्तन पॅनेलचा 17 जागांवर ऐतिहासिक विजय

पाटण । पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनेलने 17 पैकी 17 सर्व जागा जिंकत येथे सोसायटीत परिवर्तन करत ऐतिहासिक विजय मिळवला.पाटण तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असणारी ही सोसायटी प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली होती.
यामध्ये परिवर्तन पॅनलचे रमेश महेकर, जयसिंग कदम, दत्तात्रय जगताप, संतोष काटकर, गणपत भालेकर, विनायक चव्हाण, विठ्ठल सपकाळ, कुमार यादव, विलास शिर्के, सूर्यकांत मोकाशी, सुनील वायचळ, विजया आवारे, सौ. जयश्री तोडकर, सौ. भारती साठे, रमेश पोतदार, प्रवीण वडगावकर, प्रवीण आगाणे हे 17 संचालक सरासरी शंभर ते दीडशे मतांनी निवडून आले आहेत. परिवर्तन पॅनल प्रमुख व सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेंद्र जानुगडे यांच्या नेतृत्वाखाली हा विजयश्री सर्व शिक्षक, सभासद, कार्यकर्त्यांनी खेचून आणल्याची प्रतिक्रिया विजयानंतर सर्व उमेदवारांनी व्यक्त केली.
विजयानंतर गुलाबाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. निर्वाचित संचालकांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सभासद व हितचिंतकांनी अभिनंदन केले. या निवडणुकीत पाटण तालुका प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शिक्षक समिती, तालुका जुनी पेन्शन हक्क संघटना, तालुका शिक्षक भरती, तालुका केंद्रप्रमुख व पदवीधर संघटना , तालुका प्रहार शिक्षक संघटना आदींचे सहकार्य लाभल्याचे संचालक मंडळांनी स्पष्ट केले.