मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले, अन् मसूरच्या उड्डाण पुलावरची लाईट गायब

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
कोट्यावधी रूपये खर्चून उभारलेला मसूरचा रेल्वे उड्डाणपुलाचा विषय अनेक अंगाणी चांगला चर्चेला आला आहे. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन पुलाचे उद्घाटन करून लोकार्पण केले. या उदघाटनंतर आता उड्डाण पुलावरील लाईट आठ दिवसांपासून बंद असल्याने रात्री पुलावर काळोख पसरला आहे. प्रवाशांना पुलावरील अंधारातून प्रवास करावा लागत आहे. लाईट बंद मुळे अपघाताची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी उड्डाण पुलाचे उद्घाटन केले, अन् पुलावरची लाईट गायब झाली. केवळ उद्घाटनापूर्तीच पुलावरील लाईट सुरू ठेवल्या होत्या का? यामागील नक्की गौडबंगाल काय आहे, अशी चर्चा मसूर परिसरात सुरू आहे.
काही महिन्यांपासून मसूर रेल्वेगेटवरील उड्डाणपूल वेगवेगळ्या विषयांनी चर्चेत राहिला आहे. बांधकाम पूर्ण होऊनही राजकीय श्रेयवादामुळे व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला केला नव्हता. एक महिन्यापूर्वी सततची वाहतुकीची कोंडी व अपघात यामुळे हा पुल स्थानिक लोकांनीच लोकार्पण करून वाहतुकीस खुला केला होता. त्यानंतर या पुलावरील लाईट चालू होत्या. स्थानिकांनी उद्घाटन करून पूर्ण चालू केल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीला लगाम बसला होता.
मल्हारपेठ- पंढरपूर मार्गावर मसूर रेल्वेगेटवर करोडो रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलावर ३० फूट उंचीच्या कमानी बसविण्यात आल्या. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना तिरंगासदृश्य एलईडी लाईट बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे रात्रीच्यावेळी एक विहंगम असे दृश्य दिसत होते. त्यानंतर स्थानिकांनी उद्घाटन करण्यापूर्वी दीड महिना अगोदर मसूरच्या रेल्वे गेटवरील उड्डाण पुलावरील कमानीच्या एलईडी लाईट चोरीला गेल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले होते. मात्र, ही घटना स्थानिकांनी उद्घाटन करण्यापूर्वी एक महिन्यापूर्वी घडल्याचे बोलले जात होते. तेव्हा तेरी भी चूप, मेरी भी चूप या उक्तीप्रमाणे या घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली गेली नव्हती. याचे गौंड बंगाल काय? का कुंपणानेच शेत खाल्ले. अशी उलट सुलट चर्चा सुरू होती. या पुलावरील तीन खांबाच्या एलईडी लाईटच अज्ञातांनी गायब केल्या. एवढ्या उंचीवरील लाईट गायब होणे ही घटना खरंतर आश्चर्यकारक म्हणावी लागेल.
त्यानंतर मागील पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात राज्यातील रेल्वे उड्डाण पुलाचे ऑनलाईन उद्घाटन केले होते. यात मसूरच्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचाहील समावेश होता. मुख्यमंत्र्यांंनी उद्घाटन करेपर्यंत रेल्वे उड्डाण पुलावरील लाईट सुरु होत्या. मात्र, उद्घाटन केल्यानंतर या उड्डाण पुलावरील सर्वच लाईट बंद असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. उड्डाण पुलावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला आहे कि नाही हेही वाहनधारकांच्या लक्षात येत नाही.