कराडात घरात घुसून चोरट्यांनी मारला तब्बल 17 लाखांच्या दागिण्यांवर डल्ला

कराड : घरात घुसून चोरट्याने तब्बल सतरा लाख रुपयांचे दागिने लंपास केले. शहरातील वाखाण रोडलगत पी. डी. पाटील पार्क इमारतीत ही घटना घडली. याबाबत जालिंदर यशवंत रैनाक यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाखाण रोडलगत पी. डी. पाटील पार्क इमारतीत जालिंदर रैनाक हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांनी पत्नीसाठी बारा तोळे वजनाचे मंगळसूत्र, बारा तोळे वजनाचे सोन्याचे तोडे, तेरा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या बनवल्या होत्या. त्याबरोबरच त्यांनी स्वत:साठी चार तोळे वजनाची सोन्याची चैनही बनवली होती. हे दागिने त्यांनी कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. दि. 22 आॅगस्ट रोजी जालिंदर रैनाक यांनी कपाट उघडले असता कपाटातील दागिन्यांची पिशवी त्यांना दिसली नाही. त्यामुळे त्यांनी घरात सर्वत्र शोध घेतला. मात्र, पिशवी आढळून आली नाही.
दरम्यान, दि. 20 आॅगस्ट रोजी सकाळी अंगठी शोधण्यासाठी लोखंडी कपाट उघडून त्यातील दागिने असलेली पिशवी आपण बाहेर काढली होती, हे जालिंदर रैनाक यांना आठवले. तसेच पिशवी पुन्हा कपाटात न ठेवता ती खालीच ठेवून कपाट बंद केल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अज्ञाताने घरात घुसून सोन्याचे दागिने असलेली पिशवी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. जालिंदर रैनाक यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये…
4 लाख 80 हजाराचे बारा तोळ्याचे मंगळसूत्र
4 लाख 80 हजाराचे बारा तोळे वजनाचे तोडे
5 लाख 20 हजाराच्या तेरा तोळ्याच्या बांगड्या
1 लाख 60 हजार रुपये किमतीची चैन
60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या