शेअर मार्केटमधील पैश्यावरून घरात घुसून मारण्याची धमकी
मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
पाटण | शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे परत देण्याच्या कारणावरून घरात जाऊन शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी पाटण येथील एका संशयितावर मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नाडे (ता. पाटण) येथे घडला आहे.
मोना राजेंद्र डोंगळे (रा. नाडे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 4 जुलैला साडेआठ वाजण्याच्या सुमारास आमच्या राहत्या घरी पाठीमागील बाजूस सत्यजित पवार (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाटण) हा पांढऱ्या रंगाच्या कारमधून आला होता. त्याने मोठमोठ्याने ओरडून शिव्या देत दार उघडा, घरात कोण आहे? असे म्हणू लागला. त्यावेळी मी दारले असता तो दार ढकलून घरात आला.
‘तुमचा सूरज कुठे आहे. त्याला समोर आणा. त्याने व त्याचा मित्र आदित्य थरल याने माझे शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे घेतले आहेत. सूरजला जिवंत सोडणार नाही, असे तो जोरजोराने ओरडू लागला. त्यावेळी त्याच्या हातात चाकसारखे हत्यार होते. सुरज्याला माझ्या समोर आणा, नाहीतर तुम्हाला एकालाही जिवंत सोडणार नाही. असे म्हणून मोठमोठ्याने शिव्या देऊ लागला, तसेच आम्हाला धमकी देऊन घरात इकडे तिकडे सूरजला शोधू लागला. त्याला पाहून मी व जाऊ सुनीता भीतीने मोठमोठ्याने ओरडू लागल्यानंतर तो घरातून निघून गेला. शिवीगाळ, दमदाटी केली म्हणून माझी सत्यजित पवार याच्याविरुद्ध तक्रार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार पृथ्वीराज पाटील करत आहेत.