आजपर्यंत अन्नत्याग आंदोलन आता पाणीत्याग आंदोलनाचा इशारा : कराडमध्ये समतापर्वचे उपोषण
कराड | मुस्लिम समाजाला एक सुरक्षा कवच मिळणे गरजेचे आहे. ॲट्रॉसिटी सारखा कायदा मुस्लिम समाजाला मिळावा. आजपर्यंत मुस्लिम समाज कधीही रस्त्यावर आलेला नव्हता. परंतु, आज केवळ पुरुष नव्हे तर मुस्लिम समाजातील महिला सुद्धा रस्त्यावर उतरत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन भेट घेणे गरजेचे होतं, मात्र अद्याप त्यांनी भेट का घेतली नाही हे आम्हाला समजले नाही. येत्या दोन दिवसात आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र स्वरूपाचे केले जाईल. आजपर्यंत आम्ही अन्नत्याग केला होता, आता पाणी त्याग केला जाईल. यापुढे हे आंदोलन आक्रमकरित्या केले जाईल आणि जे काही होईल त्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा जावेद नायकवाडी यांनी दिला आहे.
अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून समतापर्व संयोजन समितीच्या वतीने उपोषण सुरू आहे. आज सातारा जिल्ह्यातील परजिल्ह्यातील मुस्लिम तसेच इतर समाजातील नागरिकांनी या आंदोलनाला भेट दिली. आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेल्या नागरिकांच्यामुळे तहसिल कार्यालय, पंचायत समितीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी होती. आनंदराव लादे म्हणाले, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाला आमची नम्र विनंती आहे. आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर पावले उचलावीत.
नवाज सुतार म्हणाले, सातारा जिल्हाला सध्या पालकमंत्री आहेत का नाहीत हेच आम्हाला समजत नाही. आमच्या आंदोलनातील दोन सहकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत. येत्या दोन दिवसात आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी व शासनाला आमच्या मागण्या पोहोचवाव्यात. महाराष्ट्रात मुस्लिम संरक्षण कायदा लवकरात लवकर व्हावा. मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे.