ओंड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळीसह दोन बकरी ठार

उंडाळे प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
ओंड (ता. कराड) येथे भर दिवसा भरवस्तीत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने जनावरांच्या गोठ्यावरच हल्ला केला. या हल्ल्यात शेळीसह तिच्या दोन पिल्लांना बिबट्याने फस्त केले. या हल्ल्यामुळे ओंड ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, ओंड गावात मध्यवस्तीत अशोक ज्ञानदेव थोरात यांचे राहते घर असून त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे त्यांचा जनावरांचा गोठा आहे. बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास थोरात यांच्या पत्नीने जनावराचा गोठा स्वच्छ करून, जनावरांना वैरण टाकून त्या आपल्या कामासाठी बाहेर पडल्या. यानंतर काही वेळातच त्यांना त्यांच्या जनावरांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची समजले. या बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील एक शेळी व दोन बकरी ठार झाले.
या हल्ल्याची माहिती कराडच्या वनविभागाला कळविण्यात आली, तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरून पंचनामा केला. दरम्यान, थोरात कुटुंब अत्यंत गरीब असून मोलमुजरी करून आपला उदरनिर्वाह करते. त्यांच्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याने, त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाले. त्यामुळे शासनाने त्यांना भरीव स्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दिवसाढवळ्या भरवस्तीत बिबट्याचा हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले. तरी वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ओंडसह विभागातील ग्रामस्थांमधून होत आहे.