वीर जवान अमर रहे : कोळे येथील जवान दत्तात्रय देसाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कराड । भारतीय सैन्य दलातील जवान दत्तात्रय रामचंद्र देसाई (वय- 52) यांच्यावर आज सायंकाळी मूळगावी कोळे (ता. कराड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पुर्वी त्यांची पार्थिवची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. वीर जवान अमर रहे, वंदे मातरम् च्या घोषणांनी सारा परिसर यावेळी गहिवरला.
कोळे येथील जवान दत्तात्रय देसाई सध्या ते सीआरपीएफ मध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मुंबई, पुणे येथे भारतीय सैन्य दलात सेवा त्यांनी बजावली होती. वयाच्या 22 व्या वर्षी ते सैन्य दलात दाखल झाले होते. मुंबईच्या एका रुग्णालयात दीर्घ आजारावर उपचारादरम्यान निधन त्यांचे झाले. त्यांचे पार्थिव आज दुपारी मुळगावी कोळे येथे आणले. सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल अणि सीआरपीएफ च्या जवानांनी मानवंदना यावेळी दिली.
सीआरपीएफ अधिकारी एस. पी. धुमाळ, कराडचे नायब तहसीलदार बाजीराव पाटील, अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, मंडलाधिकारी जिंतेद्र काळे, कोळे सरपंच भाग्यश्री देसाई, उपसरपंच सुधीर कांबळे, घाडगेनाथ पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र चव्हाण, अध्यक्ष विठ्ठल पाटील राष्ट्रवादी आरटीसेलचे सारंग पाटील यासह पोलीस दल घाडगेनाथ आजी-माजी सैनिक संघटनेच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दाजंली त्यांना वाहिली. जिल्हा परिषद कोळे शाळा अणि श्री. संत घाडगेनाथ माध्यमीक विद्यालयाचे विद्यार्थी, कोळे, आणे, अंबवडे चे ग्रामस्थ अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. माजी स्वातत्र्यसैनिक कै. खाशाबा पाटील- देसाई यांचे ते पुतणे होत.