ईद- गणेशोत्सवात नियमांचे उल्लघंन केल्यास कारवाई होणारच : जितेंद्र डुडी
'एक गाव, एक गणपती' संकल्पना राबविण्याचे समीर शेख यांचे आवाहन

कराड । विशाल वामनराव पाटील
जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव, ईद सण शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडावा. पुढील 18 दिवस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रचार व प्रसार केला जाईल. मात्र, त्यानंतर कोणी नियमांचे उल्लघंन केल्यास त्याच्यावर कारवाई होणारच, असा इशाराच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी कराडमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, विजय पाटील यांच्यासह तळबीड, उंब्रज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून केल्या जाणार्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली. कराडचे माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी विसर्जनावेळी कोयना नदी व कृष्णा नदीत अचानकपणे पाणी सोडले जात असल्याने होणार्या त्रासाची माहिती देण्यात आली. त्यामुळे पालिका प्रशासनाची धावपळ उडते आणि त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत नदीत पाणी सोडताना स्थानिक प्रशासनाला विचारात घेतले जावे, अशी मागणी केली. प्रशांत यादव यांनी हाच मुद्दा उपस्थित करत पाणी टंचाईमुळे कराड परिसरातील 30 ते 40 गावातील गणेश मूर्तींचे कराड व मलकापूरमध्ये विसर्जन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याचाही विचार करावा, असे मत मांडले. मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण यांनी कराड शहरासह तालुक्यात गांजा विक्रीसह मेडिकलमधून काही औषधे खरेदी करून त्याचा नशेसाठी युवकांकडून मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष नितीन काशिद व मलकापूरचे नगरसेवक राजेंद्र यादव यांनी कोल्हापूर नाका परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला. गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीवेळी कोल्हापूर नाका परिसरात वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबवा : एसपी समीर शेख
बैठकीमध्ये विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचनांवर नक्कीच निर्णय घेतले जातील. वर्गणी बाबत कोठे जबरदस्तीचे प्रकार घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. मंडळांनी समाज कंटकांना मंडळांपासून दूर ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. शहरात वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. गणेश मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना पालिकांने राबवावी. प्रशासनाच्या सूचना सर्वांनी सकारात्मक घ्याव्यात. ध्वनिप्रदूषण बाबात प्रसार, प्रचार करण्यात येणार आहे. अनेक गावात ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेमुळे एक शांततेचे व एकतेचे वातावरण दिसून येते. तेव्हा ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात यावी, असे आवाहन पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी आवाहन केले.