पाणीदार घोलपवाडी : जलयुक्त शिवारमुळे दुष्काळी भागात झाली हरितक्रांती
मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
कराड तालुक्यातील घोलपवाडी येथे 1972 च्या दुष्काळात काढलेल्या पाझर तलावाच्या पाण्यामुळे दुष्काळी भागात हरितक्रांती होईल अशी अपेक्षा होती. या आशेवर बसलेल्यांच्या ओंजळीत एक – दोन नव्हे तब्बल 30 वर्षानंतरही पाणी पडले नाही. नियोजनाअभावी तलावात पाण्याचा साठाच करता आला नाही. मात्र, आता जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामामुळे मोठी हरितक्रांतीच घडली. घोलपवाडी गावाची ओळख एक पाणीदार गाव म्हणून झाली. आता 24 तास पिण्याच्या पाण्यासह शेतीलाही मुबलक पाणी उपलब्ध आहे.
घोलपवाडीचा पाझर तलाव 1972 च्या दुष्काळात मंजूर झाला. त्याच वर्षी कामही सुरू झाले. सहा लाख रुपये खर्च झाले. बरेच काम झाले अन् थोडे राहिले. पैसे संपल्याने ते 20 वर्ष बंद होते, ते सुरू करावे म्हणून चळवळी झाल्या. पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब चव्हाण यांनी हा प्रश्न धडीस लावला. त्यावर शिवसेनेने आंदोलनाची भूमिका घेतली. नागपूरच्या अधिवेशनात त्यावेळचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुधीर जोशी, मुंबईचे महापौर शरद आचार्य यांनी तलावाचा प्रश्न उपस्थित केला. प्रयत्नांना यश आले. शासनाने 3 सप्टेंबर 1993 ला तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी तो जिल्हा परिषदेकडे वर्ग केला. त्याचा सुधारित खर्च 33 लाखावर गेला. जून 1995 ला तलावात पाणी खेळू लागेल अशी प्रार्थना केली गेली, पण व्यर्थच. दुष्काळी भागात हरितक्रांती घडणार ही आशा फोल ठरली. दरम्यान 2009 ते 2019 या दशकात घोलपवाडीने तीव्र पाणी टंचाई अनुभवली. मार्च- एप्रिल शाळांची परीक्षा सुरू असतानाही विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना डोक्यावरून, खांद्यावरून, सायकलवरून, दुचाकीवरून दाही दिशा हिंडून दोन- तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत. मार्च ते मे महिन्यात शिवारातील संपूर्ण विहिरी कोरड्या ठणठणीत पडत असत. बोअरचे पाणीही पूर्णपणे आटायचे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष हे घोलपवाडीकरांच्या पाचवीलाच पुजलेले असायचे.
माजी सहकार व पणनमंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तलावाच्या तळापासून ते टोकापर्यंत आतून बाहेरून वॉटरप्रूफ कागद टाकला. दर्जेदारपणे पिचिंगचे, भरावाचे काम पूर्ण झाल्याने तलावातील पाण्याची संपूर्ण गळती व तळातील पाण्याचे परक्युलेशन थांबल्याने तलावाला बारमाही पाणी टिकून रहात आहे. पाण्यामुळे हरितक्रांती घडली. घोलपवाडी गावची ओळख पाणीदार गाव म्हणून झाली. अशी माहिती घोलपवाडीचे सरपंच पांडुरंग भगवान घोलप यांनी दिली.