कोयना धरणातून पाणी सोडले : धरणात 56. 47 TMC पाणी
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्ह्यात कोयना धरणात गेल्या 24 तासात जोर कायम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 4.54 टीएमसी पाणीसाठा वाढला असून सध्या धरणात 56. 47 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे 105 टीएमसी पाण्याची क्षमता असलेले धरण निम्मे भरले असल्याने काल सायंकाळी धरणातून 1 हजार 50 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. कोयना परिसरात जोर कायम असून सध्या धरणात प्रतिसेंकद 53 हजार 229 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे.
कोयनेत 56. 47 टीएमसी पाणीसाठा…
कोयना धरणात मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 56. 47 टीएमसी पाणीसाठा झाला असून सोमवारी धरण निम्मे भरले आहे. गेल्या 24 तासात कोयनेला- 126 मिलीमीटर, नवजा- 187 मिलीमीटर व महाबळेश्वरला- 158 मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला- 2191, नवजा- 3059 आणि महाबळेश्वरला- 2940 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
कास- यवतेश्वरला वाहतूक सुरू
येवतेश्वर घाटातील सांबरवाडी हद्दीतील धोकादायक दगड काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा यांचे मार्फत करण्यात आले. दगड काढण्याचे काम करताना निखळलेले दगड रस्त्यावर येऊन या ठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग तसेच संरक्षक कठडे तुटले आहे. अशा वेळेस सदरील ठिकाणी तात्पुरती संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून जिथे रस्त्याचा पृष्ठभाग खराब झाला आहे. त्या भागात काँक्रीटीकरण करण्यात आले व ज्या ठिकाणी संरक्षक भिंती तुटले आहेत अशा ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आलेले आहेत. रस्ता पूर्ण वाहतुकीस अद्याप चालू करण्यात आलेला नाही. केवळ एक लेन वाहनांसाठी सुरू करण्यात आल्याचे बांधकाम विभागाने सांगितले आहे.