‘कराडचा नवा पूल जीवघेणा’ (भाग- 2) : लोकसेवेचे डीपी जैन कंपनीचे 40 सुरक्षारक्षक गेले कुठे?


-विशाल वामनराव पाटील
कराडच्या कोयना पूल ते नांदलापूर फाटा असा सहापदरी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या दरम्यान, कराड व मलकापूर शहरासह पुणे- बेंगलोर महामार्गावरील मोठी वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत रहावी, तसेच लोकांना त्याचा त्रास होवू नये, यासाठी डीपी जैन कंपनी 40 सुरक्षारक्षक उभे करणार होते. परंतु, या 40 मधील चारही सुरक्षा रक्षक या मार्गावर दिसत नसल्याने अपघाताची मालिका दररोजच नव्हे तर तासा- तासाला पहायला मिळत आहे. तेव्हा कंपनीचे लोकांच्या सेवेसाठी असणारे 40 सुरक्षारक्षक कुठे गेला असा सवाल उपस्थित होत आहे.
डीपी जैन कंपनीकडून पूल पाडण्यापूर्वी तसेच अनेकदा समस्या निर्माण झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे नेते डाॅ. अतुल भोसले यांच्यासह कराड, मलकापूर शहरातील आजी- माजी नगरसेवक यांनीही बैठका घेवून कंपनीला जाब विचारला. तसेच लोकप्रतिनिधींनी सूचनाही केल्या. यावेळी प्रामुख्याने वाहतूक हाच प्रश्न व लोकांना होणार त्रास कमी होण्या संदर्भाच चर्चा झाली. तेव्हा संबधित ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांनी या कामाच्या ठिकाणी रस्त्यावर लोकांना त्रास होवू नये, तसेच वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी 40 कर्मचारी कंपनी उभे करेल असे सांगितले होते. परंतु, सध्या हे 40 जण कुठे आहेत हे शोधण्याची वेळ आली आहे.

डीपी जैन कंपनीने काम सुरू केले होते, तेव्हा पाटण तिकाटणे, कोल्हापूर नाका येथे पकंज हाॅटेल समोर, संगम हाॅटेल समोर, पादचारी उड्डाण पूल, ढेबेवाडी फाटा येथे दोन्ही बाजूला, कृष्णा हाॅस्पीटल समोर, नांदलापूर फाटा याठिकाणी पुणे आणि कोल्हापूर दिशेला जाणाऱ्या दोन्ही बाजूला सुरक्षा रक्षक उभे करण्यात आले होते. केवळ नव्याचे 9 दिवस म्हणतात. त्याप्रमाणे कंपनीने 40 लोक उभे केले, मोठा डालडाैल्ल दाखविला. परंतु, त्यानंतर आता वारंवारं छोटे- मोठे अपघात होत असतानाही दुर्लक्ष केले जात आहे. तेव्हा कंपनीचे अधिकारी आता लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक अपघातात काहींना अपंगत्व आले आहे तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कंपनीच्या या बेजबाबदार कार्यपध्दतीवर आता स्थानिक पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी बोलणार की मूग गिळून गप्प बसणार हाही सवाल उपस्थित होवू लागला आहे.
(उद्याच्या भागात- कंपनीवाले मस्त… मरण स्वस्त)



