साताऱ्याचा पुढचा खासदार कोण? (भाग-4) : राष्ट्रवादी, काॅंग्रेस, भाजप कि शिवसेनेचा
– विशाल वामनराव पाटील
सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी दोन गटात विभागल्याने तडे गेले. काॅंग्रेसचा एकमेव आमदार कराड दक्षिणेत असून जिल्ह्यात पक्षाची बांधणी आहे. शिवसेना दोन गटात विभागली असून शिंदे गटाचे दोन आमदार तर भाजपाकडे एक राज्यसभा खासदार आणि एक आमदार अशी परिस्थिती सध्या सातारा लोकसभा मतदार संघातील आहे. यामध्ये भाजपाची ताकद जादा असली तरी मतदार संघ त्याचा नाही. तरीही साताऱ्यातच नव्हे तर राज्यात लोकसभेसाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशावेळी साताऱ्याचा पुढचा खासदार राष्ट्रवादी, काॅंग्रेस, भाजप कि शिवसेना असा पेचप्रसंग सहकारी पक्षासमोरच निर्माण होवू शकतो.
सातारा लोकसभा मतदार संघात लोकसभेला उमेदवार कोण ठरला नसला तरी अनेक इच्छुक दावा करू लागले आहेत. तसेच पक्षाकडे, नेत्याकडे आपण मागणी करणार असल्याचे खासगीत बोलणे सुरू झाले. यामध्ये केवळ सातारा जिल्हा नव्हे तर राज्यात भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या 8 दिवसापूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा लोकसभा दाैराही केला. तर दुसरीकडे सध्या राष्ट्रवादीचे (शरद पवार) गटाचे सारंग पाटील यांचीही तयारी सुरू असून त्यादिशेने मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. परंतु, पक्षाची उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे साशंकता आहे. तसेच शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालीच तर अजित पवार गट काय भूमिका घेणार या द्विदा मनस्थितीमुळे सारंग पाटील यांचा गट काही पाऊले जपून उचलत आहे. परंतु, राष्ट्रवादी पक्षाकडून ग्राऊंडवर कोणतीही तयारी सध्या सुरू नाही, यांचा फटका आगामी काळात बसू शकतो. सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचीही तयारी सुरू असून त्यांची अवस्था सारंग पाटील यांच्यासारखीच आहे. भाजपाकडून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून तयारी नसली तरी राज्यातील नेते ऐनवेळेला बोलावणं करतील अशी चर्चा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत आहे. छ. उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळावी, ही सातारकरांची इच्छा आहे. मात्र, स्वकियांसह कराडकरांची नाराजी दूर करण्यासाठी काही पाऊले उचलणे गरजेचे आहे.
काॅंग्रेस पक्षाकडून लोकसभेची कोणतीही तयारी सुरू नाही. कारण मतदार संघ मित्रपक्ष राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादीत दोन्ही गटाने उमेदवार दिल्यास ऐनवेळी सक्षम उमेदवार देवून काॅंग्रेस दावा करू शकते, तसेच परिस्थितीचा अंदाज बांधून खुद्द शरद पवार या मतदार संघात वेगळा निर्णय घेतील अशी शक्यता आजच्या स्थितीला बोलली जात आहे. दुसरीकडे जी परिस्थिती राष्ट्रवादीची तीच परिस्थिती थोडीशी मिळतीजुळती शिवसेनेची आहे. मतदार संघ शिवसेनेचा असला तरी सध्या तयारी भाजपाची जोरदार सुरू आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट असो की ठाकरे गट) बॅकफूटवर पडलेले आहेत. त्यामुळे ऐनवेळेला शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप असा विचार झाल्यास भाजपाला मतदार संघ सोडावा लागेल. परंतु, सत्तेत महायुतीत अजित पवार गट असून ते आपला दावा सोडणार नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या हातून मतदार संघ निसटताना दिसत असला तरी भाजपाला न मिळता, अजित पवार गटाला द्यावा लागू शकतो. अजित पवार हे साताऱ्यावरील आपला दावा कधीही सोडू शकत नाहीत. त्यामुळे महायुती म्हणून निवडणूक लढल्यास या परिस्थितीचा सर्वात जास्त फायदा अजित पवार गटाला मिळू शकतो.
काका- पुतण्याचं राजकारण
सध्या राज्यात काका- पुतण्याचे राज्यातील राजकारण कोणत्या दिशेला जाणार यांचा फैसला सातारा लोकसभा मतदार संंघ ठरवेल असं राजकीय जाणकारांना वाटतं. तेव्हा साताऱ्यात पुढचा खासदार राष्ट्रवादी (अजित पवार कि शरद पवार), भाजप, शिवसेना आणि काॅंग्रेस यामध्ये कोणाचा होईल, याबाबत खालील लिंकवर कमेंट, लाईक करा अन् सांगा…
सातारा जिल्ह्याचा पुढचा खासदार कोण?(हँलो न्यूज पोल- 2024)
खालील फेसबुक लिंकवर आपलं मत नोंदवा
https://www.facebook.com/groups/1728379947631362/permalink/1728397130962977/?mibextid=Nif5oz
खालील युट्यूब लिंकवर आपलं मत नोंदवा
https://youtube.com/@vishal_patil?si=4-CsPL6XqCuJ1wFN