कराड तालुक्यात 5 गावात महिला कोतवाल तर 4 गावातील पदे मंजुरीनंतर भरली जाणार

कराड। विशाल वामनराव पाटील
कराड तालुक्यातील 19 सजातील “कोतवाल” संवर्गातील रिक्त पदासाठी आरक्षण सोडत करण्यात आली. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवड समितीच्या उपस्थितीत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत – तहसिल कार्यालय कराड येथे पार पडला. शासनाच्या नियमानुसार 80 टक्के सजातील आरक्षण जाहीर करण्याचे असल्याने 15 सजातील कोतवाल भरती होणार आहे, तर मलकापूर, साजूर, वाघेरी व किवळ या गावातील आरक्षण जाहीर झाले असलेले तरी कोतवाल भरती सध्या होणार नाही.
एकूण 15 सजामधील कोतवाल पदासाठी आरक्षण पुढीलप्रमाणे-
अनुसूचित जाती जमाती आरक्षण गावे – कोपर्डे हवेली (महिला), गोटे (महिला), वसंतगड. तालुक्यात इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) 15 पदे देय असून 13 पदे यापूर्वीच भरलेली आहेत. त्यामुळे ओबीसी 2 पदासाठी शेरे व आटके (महिला) सजासाठी आरक्षण जाहीर केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 2 पदे राखीव असून तिथे निगडी (महिला). सर्वसाधारण प्रवर्ग – कालगांव, चिखली, मरळी, वारूंजी, विंग, काले, इंदोली, पोतले (महिला), आणे (महिला)
कराडच्या तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार विजय माने, आनंदराव देवकर यांच्यासह मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. कराड तालुक्यात भटक्या विमुक्त जाती/विमुक्त 40 पदे देय असून आधीच 42 पदे भरलेली आहेत. विशेष मागास प्रवर्गातील 2 पदे यापूर्वीच भरलेली आहेत. त्यामुळे याठिकाणी आरक्षण काढण्यात आलेले नाही. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या दुसरीतील विद्यार्थी युसुफ शेख, सुभान सुतार यांनी काढल्या.