अक्षय मोहिते विरूद्ध मनीष रायते यांच्यातील लढत बरोबरीत
आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती मैदान
कराड | माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त काल कराड येथील बैलबाजार मैदानात झालेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात प्रथम क्रमांकाच्या अक्षय मोहिते विरूद्ध मनीष रायते यांच्यातील कुस्तीत बराच वेळ घमासान झाले. कुस्ती निकाली होत नसल्याने पंचांनी अखेरीस ती बरोबरीत सोडवली. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकराव चव्हाण, युवा नेते इंद्रजीत चव्हाण व राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजारात काल झाले. मैदानात शंभरहून अधिक चिमुकल्या मल्लांसह अनेक नामांकित पैलवानांनी चित्तथरारक कुस्त्या केल्याने शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
आ. पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील – उंडाळकर, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात, अधिकराव चव्हाण, युवा नेते राहुल चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, गजानन आवळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस पैलवान नानासाहेब पाटील, कराड दक्षिण सेवादल काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोहिते, नरेंद्र नांगरे – पाटील, प्रदीप जाधव, सुभाषराव पाटील, नितीन थोरात, अशोकराव पाटील – पोतलेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अधिकराव चव्हाण, राहुल चव्हाण, आनंदराव पाटील, नजरूद्दीन नायकवडी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली. कुस्तीला सुरुवात होताच न थांबता व न थकता दोन मल्लांनी कुस्तीची लढत दिली. मनीष अक्षयवर सतत ताबा घ्यायचा. व अक्षय शिताफीने व चपळाईने मनीषचे डाव धुडकावून लावायचा. बराच वेळ कुस्ती निकाली होत नसल्याने अखेरीस पंचांनी कुस्ती बरोबरीत सोडवली.
दिग्विजय जाधव विरूद्ध बाबा रानगे यांच्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत दिग्विजयने बाबा रानगेला घुटना डावावर आस्मान दाखवले. तिसऱ्या क्रमांकाची शुभम पाटील विरूद्ध भावेश सावंत यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. रणजीत राजमाने विरूद्ध सागर काळे यांच्यातील चौथ्या कुस्तीत रणजीतने सागरला एकचाक डावावर काही क्षणातच चितपट केले. पाचव्या कुस्तीतील सोहेब पटेल विरूद्ध अभिषेक घार्गे यांच्यातील कुस्तीत अभिषेक न आल्याने सोहेबला विजयी घोषित करण्यात आले. व सागर सावंत विरूद्ध संग्राम सुर्यवंशी यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. यावेळी भारत पवार, आकाश वेताळ, जगन्नाथ पावणे, आण्णा पाटील यांच्यासह मल्लांनी चटकदार कुस्त्या केल्या. संतोष जगताप, देवदास माने, जयकर खुडे, धनाजी पावणे, सतीश डांगे, मस्जिद पटेल, सतीश पानुगडे, शशिकांत घोडके, प्रशांत पाटील, युवराज पाटील, शंभूराज थोरात, गणेश माने, विनोद पाटील, दिग्विजय पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सुरेश जाधव यांनी समालोचन केले.