साताऱ्यात कोयता नाचवत युवकांच्या टोळक्याचा सशस्त्र हल्ला

सातारा | शहरातील बसाप्पा पेठेतील सेनॉर चौकात युवकांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करत एका चारचाकी मोटारीची तोडफोड केली. या हल्ल्यात सुदैवाने चारचाकीतील कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या हल्ल्यामुळे बसाप्पा पेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही युवक चारचाकी मोटार सेनॉर चौकात थांबवून परिसरात असणाऱ्या पाणीपट्टीवर थांबले होते. थोडावेळ तिथे थांबल्यानंतर ते युवक पुन्हा चारचाकीत बसले. याचदरम्यान तिथे युवकांचे एक टोळके आले. या युवकांनी कोयते काढत चारचाकीवर हल्ला केला.
हल्लेखोर युवकांनी चारचाकीच्या काचा फोडत आतील युवकांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याला चारचाकीत असणाऱ्या युवकांनी प्रतिकार केला, यानंतर हल्लेखोर त्याठिकाणाहून पळाल. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी माहिती घेत हल्लेखोर युवकांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवला होता.