मसूरचे सरपंच पंकज दीक्षित यांना “यशवंतराव चव्हाण आदर्श सरपंच” पुरस्कार

मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
मसूर (ता. कराड) येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकज दीक्षित यांना “यशवंतराव चव्हाण आदर्श सरपंच” पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. सरपंच परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य व पंचायत समिती कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सरपंच उपसरपंच व सदस्य यांची कार्यशाळा व आदर्श सरपंच पुरस्कार वितरण सोहळा वेणुताई सभागृह कराड येथे आयोजीत करण्यात आला. त्यावेळी त्यांना पुरस्कार वितरण करण्यात आला.
सरपंच दीक्षित यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण माजी सभापती मानसिंगराव जगदाळे व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने विस्ताराधिकारी विकास स्वामी, सदस्य रमेश जाधव, संजय शिरतोडे, सुनील जगदाळे, प्रमोद चव्हाण, कैलास कारणे, कांचन पारवे, रूपाली गरवारे, कौसल्या पाटोळे, वैशाली पाटोळे, पूजा साळुंखे यांनी त्यांचा सत्कार केला.
मला माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच “यशवंतराव चव्हाण आदर्श सरपंच” पुरस्कार प्राप्त झाला. मी ज्यांना आदर्श मानतो, ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावाचा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार मला मिळाला व तो पुरस्कार स्वर्गीय वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये दिला गेला, हे मी माझे परमभाग्य समजतो. या पुरस्काराचे खरे मानकरी माझे सर्व सहकारी सदस्य, उपसरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ, मार्गदर्शक, मित्रमंडळी, पत्रकार बंधू व विशेष करून माझा कुटुंब व परिवार हे आहेत. ग्रामविकासाचे संकल्प होते ते सत्यात उतरवण्यासाठी खऱ्या अर्थाने लोकांनी सहकार्य केले, असे सरपंच पंकज दीक्षित यांनी सांगितले.