कोयना धरणातून आज 2 टीएमसी पाणी सोडणार : शंभूराज देसाई

मुंबई- सातारा आणि सांगली जिल्ह्यातील नदीपात्रात पाण्याने तळ गाठला असून शेती तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या प्रश्नावर आज मुंबईत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून कोयना धरणातून 2 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दुपारनंतर कोयना आणि कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.
पाॅवर जनरेशनचे पाणी शेतीसाठी
मुख्यमंत्र्यांनी आणखी एक आदेश दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करून कोयना धरणात जे पाणी पाॅवर जनरेशसाठी राखीव ठेवले आहे ते कमी करून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वळवावे. पाॅवर जनरेशच पाणी कमी केल्याने वीज कमी तयार होणार असून ती अोपन मार्केटमधून वीज खरेदी करावी लागली तर त्यांना निधी खर्च करावा, यासाठी चर्चा करणार आहोत. शेवटी लोकांना पिण्याचे पाणी आणि शेतीला पाणी मिळावे, अशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
जनतेला आवाहन
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे कोयना धरण 105 टीएमसी असून दरवर्षी पूर्ण क्षमतेने भरत असते. परंतु, चालू वर्षी 27 ते 30 टीएमसी पाणीसाठा धरणात कमी आहे. त्यामुळे जुलै 2024 पर्यंत सध्या असलेले पाणी पुरवायचे आहे. राज्यातील तसेच सातारा आणि सांगली जिल्ह्यातील विशेष करून जनतेला आवाहन करतो. पाण्याची कमतरता असून आपण काटकसरीने वापर करित आहोत. पाण्याचे नियोजन केले असून पहिले प्राधान्य पिण्यासाठी, नंतर शेतीला आणि शेवटी आैद्योगिक वापराला दिले आहे. जो उपलब्ध कोयना धरणातील साठा पुढचा पाऊस पडेपर्यंत टिकला पाहिजे असे नियोजन आहे.