Satara अर्धा किलो चांदीसह 64 तोळे सोने जप्त : तब्बल 21 गुन्हे उघडकीस

सातारा | सातारा स्थानिक गुन्हा शाखा सातारा यांनी पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून तब्बल 21 गुन्हे उघड करून 36 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतले असून 64 तोळे सोने आणि अर्धा किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत पोलिस अभिलेखावरील आरोपी चांद उर्फ सुरज जालिंदर पवार हा काळज गावच्या हद्दीतील बडेखान या ठिकाणी आहे. अंमलदार तानाजी माने, अमोल माने, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड यांच्या तपास पथकाने बडे खान परिसरात तीन दिवस सापळा लावला होता. त्यानंतर काटेरी झाडतून पाठलाग करून आरोपी चांद उर्फ सुरज जालिंदर पवार (वय- 22, रा. काळज) याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार पृथ्वीराज युरोपियन शिंदे (रा. ठाकूरकी, ता. फलटण) चिलम्या उर्फ संदीप महावीर उर्फ माळव्या शिंदे ( रा. सुरवडी, ता. फलटण) व इतर तीन साथीदारांसमवेत गुन्हा केला असल्याचे सांगितले.
संशयित तीन आरोपींना या गुन्ह्यात अटक करून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुद्देमालापैकी 46 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करण्यात आले. तसेच आणखी 20 गुन्ह्यातील एकूण 64 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, अर्धा किलो चांदीचे दागिने, मोटरसायकल असा एकूण 36 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांच्यासह गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली