अवकाळी पाऊस : कराड तालुक्यात गारपीट तर शहरात 2 ठिकाणी वीज कोसळली
कराड | कराड शहर विजांच्या कडकडाटासह तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने पावसाने चांगलीच तारांबळ उडवली. कराड शहरातील पंताचा कोट व शुक्रवार पेठेत वीज पडल्याने दोन झाडे जळाल्याची घटना घडली आहे. कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत झाडावरील आग विझवली.
कराड तालुक्यात दुपारी 4 नंतर पावसाने विजांच्या कडकटासह हजेरी लावली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. सुपने- तांबवे, विंग, कोळे, कालवडे, बेलवडे, कासार शिरंबे परिसरात गारांसह पाऊस झाला असून अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे.
आज दिवसभर उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा दिला. परंतु अचानक कोसळल्याने कामावरून घरी परतणाऱ्या तसेच शेतात काम करणाऱ्यांची पळापळ उडाली. कराड- पाटण मार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागली.