Satara रात्री युवतीसह तिघांना लुटले : निर्जनस्थळी वाढदिवस साजरा करणे पडले महागात

कराड | वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जनस्थळी गेलेल्या दोन मैत्रीणी आणि त्यांच्या एका मित्राला तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. टेंभू (ता. कराड) येथे रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यानगर येथे राहणाऱ्या एका युवतीचा मंगळवारी वाढदिवस होता. सचिन कोळी हा त्या युवतीचा मित्र असून त्याने त्या युवतीच्या मैत्रिणीला मेसेज करून आपण वाढदिवसाचा केक कापूया, असे सांगितले. त्यानुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन कोळी हा त्याची कार घेऊन विद्यानगर येथे गेला. तर वाढदिवस असलेली युवती आणि तिची मैत्रीण गाडगे महाराज महाविद्यालयासमोर सचिन कोळी याच्या कारमध्ये बसल्या. त्यानंतर सचिनने कार कृष्णा कॅनॉलवरून ओगलेवाडी रस्त्याने टेंभू गावच्या हद्दीतील डोंगराकडे नेली. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निर्जन ठिकाणी कार थांबल्यानंतर संबंधित दोन्ही युवती आणि सचिन कोळी हा कारमधून उतरून बोलत थांबले होते. त्यावेळी अचानक तीघेजण त्याठिकाणी आले. त्यांच्या हातात कोयते होते. एवढ्या रात्री तुम्ही इथे कशाला आलाय, असे म्हणून त्या तिघांनी सचिन कोळी याच्यासह दोन्ही युवतींना धाक दाखवला.
एका युवतीच्या कानातील कर्णफुले काढून घेतली. तसेच तिघांचेही मोबाईल त्यांनी काढून घेतले. तिघांना कारमध्ये घालून लुटमार करणाऱ्यांनी कार डोंगराच्या दिशेने पुढे नेली.
मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर डोंगराखालून बॅटऱ्यांचा उजेड दिसू लागल्यामुळे संशयीतांनी कर्णफुले आणि तीन मोबाईल असा 72 हजाराचा ऐवज लुटून तेथून पळ काढला. त्यानंतर सचिन कोळी आणि त्या दोन युवती पुन्हा कारमध्ये बसून डोंगरावरून खाली येत असताना युवतींचे पालक त्यांना रस्त्यात भेटले. पालकांना हा प्रकार समजल्यानंतर सर्वजण कराड तालुका पोलीस ठाण्यात आले. याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.