राज्याचे लक्ष अजित पवार काय बोलणार : कोरेगावात कमराबंद चर्चा सुरू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव येथील निवासस्थानी आगमन झाले असून तेथे राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत चर्चेस सुरूवात झाली आहे. यानंतर काही वेळातच शेतकरी मेळाव्यास जाणार आहेत. कोरेगाव येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थित बैठक सुरू असून त्यास विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, पाटणचे युवा नेते सत्यजित पाटणकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित आहेत.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेला यशानंतर अजित पवार काय बोलणार याकडे कोरेगावसह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आमदार महेश शिंदे यांच्याकडून सतत पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले जाते. अशावेळी महेश शिंदेचा पराभव आणि राष्ट्रवादीचा कोरेगाव बाजार समितीत विजय यामुळे आता अजित पवार काय बोलणार याकडं राजकीय वर्तुळातील सर्वांच लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा, सातारा जिल्हा बॅंक, कोरेगाव नगरपालिका येथे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर आता बाजार समितीत यश मिळाले आहे. त्याचबरोबर आ. शशिकांत शिंदे आणि अजित पवार यांच्यात जमत नसल्याच्या बातम्याही समोर आलेल्या होत्या. परंतु अजित पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानीच एन्ट्री केल्याने महेश शिंदे यांचा समाचार घेतील असे बोलले जात आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात आज आणि उद्या अजित पवार काय, काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.