Satara News : बांधकामाच्या पैशावरून मारहाण तिघांवर गुन्हा
कराड | बांधकामाचे पैसे देण्याघेण्याच्या कारणावरुन गवंड्यासह त्याच्या भावाला ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये गवंड्याचा भाऊ सलीम याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याची डोक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबतची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीम नुरमोहम्मद शेख (रा. बापुजी साळुंखेनगर, कार्वेनाका, कराड) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत गवंडी महम्मदहुसेन नुरमोहम्मद शेख याने कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन तय्यब मुल्ला, सोहेल मुल्ला (दोघेही रा. भाजी मंडई, गुरूवार पेठ, कराड) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहरातील सुर्यवंशी मळ्यात तय्यब मुल्ला याच्या घराचे बांधकाम महम्मदहुसेन शेख याने केले होते. या कामाच्या पैशाचा हिशोब करण्यासाठी तय्यबने महम्मदहुसेनला रविवारी सायंकाळी कामाच्या ठिकाणी बोलवले. त्यानुसार महम्मदहुसेन त्याठिकाणी गेला असता, तुला अगोदरच कामाचे 70 हजार रुपये दिले आहेत आणि ते पैसे कामापेक्षा जास्त आहेत, असे म्हणून तय्यबने हिशोब करण्यास नकार दिला. मात्र, हिशोब करुन बघूया. पैसे जास्त झाले असतील तर मी तुम्हाला ते परत करतो, असे म्हणून महम्मदहुसेन याने हिशोब करण्याची विनंती केली. तय्यबने त्याला नकार दिला. तसेच त्याच्यासह इतर दोघांनी दमदाटी केली. त्यामुळे महम्मदहुसेन याने त्याचा भाऊ सलीम याला त्याठिकाणी बोलाऊन घेतले. सलीमनेही तय्यबला हिशोब करण्यास सांगितले. मात्र, तुम्ही इथून जा नाहीतर ठार मारतो, असे म्हणून संबंधित तिघांनी सलीम व महम्मदहुसेन या दोघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.