मसूरच्या रेल्वे गेटवरचा रस्ता उखडला : कोणेगाव, कवठे- केंजळला जाणारा मार्गच बंद

मसूर प्रतिनिधी| गजानन गिरी
रेल्वे प्रशासनाने मसूरच्या रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या खालील बाजूस सुरू असलेला रेल्वे गेटवरचा रस्ता उखडून टाकला आहे. मार्गच बंद केल्याने दक्षिण बाजूस कोणेगाव, उत्तरबाजूस कवठे- केंजळ गावांना जाणारा मार्गच बंद झाला आहे. उड्डाणपूल उतरल्यानंतरच धोकादायक वळणावरून या गावाकडे जाण्यासाठी एकाच बाजूस सेवा रस्ता असल्याने उलटे वळूनच जावे लागत आहे. त्यामुळे अपघातग्रस्त ठिकाण बनल्याने श्वास रोखत प्रवास करण्याची वेळ रेल्वे प्रशासनाने आणली आहे. वेगवेगळ्या घटनांनी चर्चेत असलेल्या मसूरच्या रेल्वे उड्डाणपुलाचा विषय विविध बाबीमुळे चांगला चर्चेला आला असतानाच आणखी एका मोठ्या महत्त्वपूर्ण समस्येची भर पडली आहे. रेल्वेगेट पूर्ववत सुरु न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मल्हारपेठ- पंढरपूर मार्गावरील मसूरचा रेल्वे उड्डाणपूल होण्याअगोदर पुलाच्याखाली रेल्वेगेट आहे. रेल्वे येण्याच्या वेळेत ते बंद केले जात होते. गेटबंदमुळे दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. त्यातच वाहतुकीच्या कोंडीचाही प्रश्न उद्भवला होता. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल बांधला. उड्डाणपूल वाहनधारकांना प्रवासाच्या दृष्टिकोनातून सोईस्करी ठरत आहे. रेल्वेगेट ओलांडतात दोन्ही बाजूस कोणेगाव – कवठे गावांना जाणारा रस्ता आहे. पण, आता रेल्वेगेटवरचा दोन्ही बाजूचा रस्ता उखडल्याने या गावांना जाण्यासाठी उड्डाणपूल उतरल्यानंतरच लांब अंतरावरून परत फिरावे लागत आहे. मुख्यतः उत्तर बाजूकडे एकच सेवा रस्ता आहे. दक्षिण बाजूस सेवा रस्ता नसल्याने उजवीकडे वळूनच सेवा रस्त्याने मार्गस्थ होत. कवठे, कोणेगावच्या लोकांना लांब अंतरावरून धोकादायक स्थितीत उलटीभ्रमंती करावी लागत आहे. उड्डाणपूल उतरताना वाहनांचे वेग जास्त असल्याने उजवीकडे वळणाऱ्या वाहनांना श्वास रोखतच वळावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने अपघातग्रस्त स्थिती आणून ठेवली आहे.
रेल्वे प्रशासनाची डोळेझाक
वास्तविक उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सेवारस्ता करणे गरजेचे होते. मात्र, सेवारस्ता एका बाजूसच आहे. मुख्यतः उड्डाणपुलाच्या सुरुवातीस दोन्ही बाजूकडे रस्ता रुंदीकरण करणे महत्त्वपूर्ण आहे. असे असताना रेल्वे प्रशासनाने याकडे मोठी डोळेझाक केली आहे. अपघात घडल्यानंतरच रेल्वे प्रशासन जागे होणार का? हा मोठा गांभीर्याचा विषय बनला आहे. रेल्वेगेटनजीक कोणेगाव व कवठे- केंजळ गावच्या लोकांना मार्गस्थासाठी भुयारी मार्ग होणार असल्याची अधिकृत माहिती आली आहे. भुयारी मार्गाचे काम होईपर्यंत रेल्वेगेट सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.