यशवंत बँकेचे तरुण उद्योजकांना 4 कोटी 71 लाखांचे अर्थसहाय्य : शेखर चरेगांवकर
कराड शाखेचा 13 वा वर्धापनदिन
कराड । विशाल वामनराव पाटील
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापित आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या सहकार्यातून तरुणांना उद्योगाला प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने यशवंत बँकेच्या वतीने 46 तरुणांना 4 कोटी 71 लाखांचे अर्थ सहाय्य केले आहे. या सर्व उद्योजकांचा सन्मान कराड शाखेच्या 13 व्या वर्धापनदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या वतीने करण्यात आला.
या सर्व कर्जांची दरमहा नियमित परतफेड होत असून कर्जावरील 12% पर्यंतच्या व्याज रकमेचा संपूर्ण परतावा महामंडळ देत असल्याने उद्योजकांना एका अर्थी बिन व्याजी कर्जच उपलब्ध झाले आहे. यामुळे व्यवसायातील नफ्याचे प्रमाण देखील वाढले आहे. बँकेने केलेले मार्गदर्शन, उपलब्ध कर्ज पुरवठा व महामंडळाचे आर्थिक सहकार्य मिळाल्याने या उद्योजकांचा व्यवसायातील उत्साह द्विगुणित झाला आहे. ज्या तरुणांना नवा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यांना त्याविषयीचे संपूर्ण मार्गदर्शन करून शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल असे आश्वासन यावेळी शेखर चरेगांवकर यांनी दिले. शाखा वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास देखील उत्तम प्रतिसाद मिळून 80 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. सातारा येथील बालाजी ब्लड बँकेचे याकामी सहकार्य लाभले. सहभागी रक्तदात्यांना बँकेच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. यशवंत परिवारातील 10 वी – 12 वी परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या 25 विद्यार्थ्याचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते किसनराव पाटील व दत्ता भट यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्धापनदिनी आयोजित या सर्व कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, उपाध्यक्ष अजित निकम, संचालक सौ.कल्पना गुणे, गोपीनाथ कुलकर्णी, महेशकुमार जाधव, जयवंत जगदाळे, डॉ.प्रदीपकुमार शिंदे, डॉ.सचिन साळुंखे. सुहास हिरेमठ, प्रसाद देशपांडे, संदीप इंगळे, प्रशांत जंगाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वैशाली मोकाशी व वरिष्ठ अधिकारी, सेवक वर्ग उपस्थित होते.