सातारचे खासदार कडाडले : टोलनाके स्थलांतरित करा अन्यथा पूर्णतः सूट द्या
कराड । राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी व तासवडे येथील टोलनाके जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करा किंवा या दोन्ही टोलनाक्यावरील टोलमध्ये सातारा जिल्ह्यातील जनतेला पूर्णतः सूट द्या, अशी जोरदार मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी संसदेत केली. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून खासदार श्रीनिवास पाटील यांनी नियम 377 नुसार तातडीचे व लोकहितासाठी महत्वाचे मुद्दे सादर करून सभागृहाच्या पटलावर ठेवले. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, महामार्गावर पडलेले खड्डे, संथगतीने सुरू असलेले खंबाटकी बोगदा व सहापदरीकरणाचे काम, प्रलंबित असलेले उड्डाणपूल तसेच टोलनाक्याच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित करत ही मागणी केली.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात आनेवाडी आणि तासवडे असे दोन टोलनाके आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कामाच्या निमित्ताने दिवसातून दोन-चार वेळा या दोन्ही टोलनाक्यांवरून जावे लागते. या दोन्ही टोलनाक्यांवर 75 रुपयांपासून 425 रुपयांपर्यंतचा कर वाहनधारकांडून वसूल करण्यात आला आहे. मात्र, वसूल केलेल्या कर उत्पन्नानुसार दिल्या जाणाऱ्या सुविधा मात्र खूपच कमी आहेत. जसे रुग्णसेवा, क्रेन, शौचालय, रात्रीच्या वेळी विद्युत प्रकाश आणि इतर अत्यावश्यक सेवा वाढविण्याची गरज आहे. खरतर हे दोन्ही टोलनाके सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करण्याची गरज आहे. तसे करता येत नसेल तर सातारा जिल्ह्यातील जनतेला या दोन्ही टोलनाक्यांवर टोलमध्ये संपूर्ण सूट दिली जावी.
यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावरील पुणे ते सातारा आणि सातारा ते कोल्हापूर या भागावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मार्गाची दुरावस्था झाल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. प्राधान्याने खड्डे बुजवून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे. तसेच रस्ता पूर्णपणे अपघातमुक्त करावयाचा असेल तर हे खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाने बुजवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग एन.एच. 4 चे चौपदरीवरून सहापदरीकरण करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. सातारा ते पुणे विभागाचे काम पूर्ण होण्यास अजून किती कालावधी लागणार आहे? तसेच खंबाटकी बोगद्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, असा सवाल त्यांनी केला. खंडाळा तालुक्यातील पारगाव आणि शिरवळ येथील उड्डाणपूल तसेच वेळे येथे ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली आहे. सदरच्या उड्डाणपूलांची कामे लवकर सुरू करावीत अशी मागणीही खासदार श्री. पाटील यांनी यावेळी केली आहे.