ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराजकियराज्यशैक्षणिकसातारासामाजिक

सातारा जिल्ह्यासाठी नविन 200 एसटी बसेसची व्यवस्था करा : खा. श्रीनिवास पाटील यांची सरकारकडे मागणी

सातारा | सातारा जिल्ह्यातील नादुरूस्त व अपुऱ्या एसटी बसमुळे प्रवाशी सेवा पुरती विस्कळीत आहे. परिणामी नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याने त्यात प्राधान्याने सुधारणा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील कालबाह्य झालेल्‍या एसटी बस हटवून नवीन किमान 200 बसची व्यवस्था करावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी राज्य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, एसटीचे उपाध्‍यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्‍ने, विभागीय नियंत्रक रोहन पलंगे यांना पत्र लिहले आहे.

खा. श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे, महाराष्‍ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाच्‍या सातारा जिल्‍ह्यातील 11 आगारातील सुमारे 173 हून अधिक एसटी बसेस कालबाह्य झाल्याचे समजते. सदर गाड्या रस्‍त्‍यावर चालण्‍यायोग्‍य उरलेल्‍या नाहीत. प्रवाशी संख्‍येच्‍या तुलनेत एसटी बसेस खूपच कमी असून जिल्‍ह्याचा पश्चिम ग्रामीण भाग डोंगरदर्‍यांचा असून तालुक्याच्‍या व जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी जाण्या- येणेसाठी एसटी शिवाय दुसरा सामान्‍यांना परवडणारा पर्याय नाही. हजारो विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षण घेण्‍यासाठी जिल्‍ह्याच्‍या व तालुक्‍याच्‍या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दररोज प्रवास करीत असतात. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर तसेच राज्‍यातील इतर भागामध्‍ये व परराज्‍यामध्‍ये जाणा-या राज्‍यातील प्रवाशांची संख्‍या या जिल्‍ह्यात मोठी आहे. याशिवाय महिला सन्‍मान योजना, अमृत जेष्‍ठ नागरिक योजना व इतर सवलतींमुळे प्रवाशी वर्ग मोठ्या प्रमाणात एसटीकडे वळला आहे. त्यामुळे एसटी बसेस हाऊसफुल्‍ल होतात व प्रवाशांच्‍या लांबच लांब रांगा उभ्‍या राहत असल्याची माहिती प्रसारमाध्‍यमातून रोजच प्रसिध्‍द होत आहे.

जिल्‍ह्याच्‍या व तालुक्‍याच्‍या ठिकाणी जाणे-येणेसाठी गेल्‍या सहा महिन्‍यांपासून जिल्‍ह्यातील सर्व आगारातील एसटी बस सेवा विस्कळीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या 173 बस परिवहन विभागाच्‍या नियमानुसार स्‍क्रॅप करण्‍यात आलेल्‍या असल्‍याचे समजते. अजूनही पुढे सहा महिन्‍यांनी 50 बसेस कालबाह्य करुन स्क्रॅप होणार असल्याची माहिती मिळते. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना सध्‍याच्‍या परिस्थितीत खूपच त्रास होत असल्‍याबाबतच्‍या तक्रारी माझ्याकडे लोकप्रतिनिधी म्‍हणून नेहमी येत असतात. सातारा जिल्‍ह्यासाठी आपण नवीन 200 एसटी बसेस दिल्‍यास जिल्‍ह्यातील असणा-या 11 आगारामध्‍ये चांगल्‍या प्रकारे ग्रामीण व शहरी प्रवाशांची व विद्यार्थ्यांची सोय होईल. तसेच राज्‍य परिवहन मंडळाचे उत्‍पन्‍नही मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आशा आहे. आपण याबाबत लक्ष देऊन सातारा जिल्‍ह्यामध्‍ये एसटी बसचा असणारा तुटवडा भरुन काढण्यासाठी तात्काळ पाऊले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker