विरवडेत दोन गटात तुंबळ हाणामारी, 30 जणांवर गुन्हा

कराड/प्रतिनिधी – जागेच्या मालकीवरून बुधवारी सकाळी विरवडे (ता.कराड) येथे झालेल्या तुंबळ मारामारीत शहर पोलिसांत दोन्हीकडील 30 जणांविरोधत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अन्य संशयीतांचा पोलिस शोध घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मुकूंद नामदेव कदम (रा.हजारमाची) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फिरोज सलिम खान व त्याच्या साथीदारांनी विरवडे येथील ऊस शेताचे नुकसान केले. यास विरोध केला असता मुलगा संदिप कदम व अन्य लोकांना चाकू, लाकडी दांडके व हाताने मारहाण केली. तसेच 50 हजार रूपयांची रोख रक्कम व दिड तोळयाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी फिरोज सलिम खान (वय 48 रा.विरवडे) जावेद कादर पठाण (वय 49 रा.मंगळवार पेठ कराड) श्रवणकुमार चेतलाल तिवारी ( वय 49 रा. गजानन हौसिंग सोसायटी) यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वरील तिघांना अटक केली आहे.
फिरोज सलिम खान (रा. विरवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेत जमिणीची लेव्हल करताना प्रितम शिंदे व त्याच्या साथीदारांनी अटकाव करून लाडकी दांडके व हाताने मारहाण केली. तसेच गळयातील दोन तोळयाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली. याबाबत प्रितम राजाराम शिंदे (वय 34 रा. विरवडे) मुकूंद नामदेव कदम (वय 66 रा.हजारमाची) अब्दुल समद महबुब अली पठाण (वय 38 रा. जुनी पेपर मिल विरवडे) विरेंद्र ठाकूर (वय-38 रा. जुनी पेपर मिल विरवडे) यांच्यासह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वरील चौघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोन्ही गटाच्या सात जणांना गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवार पर्यंत काठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळी करीत आहेत.