Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

बोगस मतदार नोंदीमुळेच कराडचा निकाल बदलला : पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

आकडेवारीसह पोलखोल, चव्हाणांच्या पोलखोलीमुळे खळबळ, प्रशासकीय यंत्रणेवर थेट निशाणा

कराड (हॅलो न्यज):- कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुबार, तिबार आणि त्यापेक्षाही अधिक वेळा नोंद झालेली नावे आढळून आली आहेत. त्या प्रकाराने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासकीय यंत्रणेने जर अशा बोगस आणि संशयास्पद नोंदींना खतपाणी घातले नसते तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ, सुरू असलेली विशेष पुनरीक्षण प्रक्रिया (एसआयआर) आणि २०२४ च्या निवडणुकीतील प्रशासकीय कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. श्री. चव्हाण म्हणाले, निवडणुकीत जय-पराजय होत असतो, लोकशाहीची प्रक्रिया आहे. मात्र, २०२४ च्या वेळी राबवण्यात आलेली संपूर्ण मतदार नोंदणी प्रक्रिया अत्यंत संशयास्पद होती.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कराड दक्षिण मतदारसंघात ३ लाख १५ हजार ४२० मतदार नोंदवले गेले होते. मात्र, एसआयआर प्रक्रियेत कराड दक्षिणशी संबंधित तब्बल ५६ हजार ११८ संशयित दुबार नोंदी समोर आल्या आहेत. यामध्ये काही नावे समान असू शकतात पण त्याची पडताळणी आता तरी प्रशासनाने केली पाहिजे. स्थानिक दुबार नोंदीमध्ये २७ हजार ६०९ तर शेजारील पाच विधानसभा मतदार संघांतील नोंदी २८ हजार ५०९ आढळल्या आहेत. प्रांत कार्यालयाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कराड दक्षिणमधील सध्याची वास्तव मतदार संख्या २ लाख ६७ हजार ०९६ इतकी आहे.

मतदार नोंदणीबाबत विधानसभा निवडणुकी आधी व दरम्यान प्रशासनाला वेळोवेळी पत्र पाठवून सूचना करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. २८ ऑगस्ट २०२४, ९ सप्टेंबर २०२४ आणि १६ सप्टेंबर २०२४ रोजी चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. मात्र, ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी होऊ शकते आणि अशा नोंदींबाबत तक्रार घेता येत नाही किंवा त्या नोंदी कमी करण्याचा अधिकार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तेव्हा नोंदी कमी झाल्या नाहीत तर आता सर्व निवडणुका झाल्यानंतर बोगस मते कमी करण्याचा कार्यक्रमच राबविला जात आहे. पण प्रशासनाने आता तरी निपक्ष पणे प्रक्रिया राबवावी यासाठीच संशयित नोंदीची माहिती पाठवली आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूर दौऱ्यात पक्षाच्या अधिवेशनात १० टक्के मते वाढवण्याचे आवाहन केले होते. अचानक एवढी मते कशी वाढू शकतात, मतदार काय आभाळातून पडणार आहेत का, प्रत्यक्षात या आवाहनाच्या आडून राज्यभरात दुबार आणि तिबार म्हणजेच बोगस मतदार नोंदवण्याची मोहीमच राबवली गेली. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांत प्रशासनाला हाताशी धरून हा प्रकार सुरू आहे. त्याची सर्व माहिती आणि पुरावे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सादर करण्यात आले आहेत. सुरू असलेली एसआयआर प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दतीने राबवून मतदार यादीतील दुबार व संशयास्पद नावे त्वरित वगळण्यात यावीत. या संदर्भातील माहिती व याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्या होत्या. एसआयआर प्रक्रिया निष्पक्षपणे राबवून दुबार व संशयास्पद नावे वगळण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रशासनाला हाताशी धरून दुबार व तिबार मतदार नोंदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “कराड दक्षिणमध्येही अशाच पद्धतीने दुबार नावे नोंदविली गेली. जर ही नावे नोंदविण्यासाठी प्रशासनाने मदत केली नसती, तर कराड दक्षिणचा निकाल वेगळा लागला असता,” असे चव्हाण म्हणाले.

“आम्ही दिलेल्या ५६ हजार नोंदींपैकी काही नोंदी एकाच नावाच्या अनेक मतदारांच्या असू शकतात. मात्र, आम्ही सादर केलेल्या माहितीमुळे दुबार किंवा बोगस नावे शोधून कमी करण्यास प्रशासनाला निश्चितच मदत होईल. सध्या सुरू असलेली SIR प्रक्रिया तरी व्यवस्थित आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडली जावी, या उद्देशाने ही माहिती प्रशासनाला दिली आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. दुबार मतदार नोंदींचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करताना ते म्हणाले की, अशा नोंदी अस्तित्वात असल्यास संबंधित व्यक्तींना वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे मतदार याद्यांची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात उपस्थित केलेल्या व्होट चोरी च्या मुद्द्याचाही उल्लेख केला. “हीच मोहीम आणि हेच आंदोलन राहुल गांधी यांनी ‘व्होट चोरी’बाबत देशभरात केले होते,” असे चव्हाण म्हणाले.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये शेजारील विधानसभा मतदारसंघांतील मतदारांच्या नोंदी किती आहेत, याची आकडेवारीही त्यांनी यावेळी जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे :
कराड उत्तर (मतदारसंघ क्र. २५९) – ६,०६३ नावे
इस्लामपूर (मतदारसंघ क्र. २८३) – ६,४१२ नावे
शिराळा (मतदारसंघ क्र. २८४) – ७,९७६ नावे
पाटण (मतदारसंघ क्र. २६१) – ४,१०० नावे
पलूस-कडेगाव (मतदारसंघ क्र. २८५) – ३,९६२ नावे

शेवटी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. “ही सगळी निवडणूक प्रक्रिया पाहता, निवडणुकीचा निकाल निवडणूक आयोगाच्या सक्रिय सहभागामुळे बदलला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या आरोपांमुळे कराड दक्षिणसह सातारा जिल्ह्यातील मतदार याद्यांमधील दुबार नोंदी, SIR प्रक्रिया आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील मतदार नोंदणी प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close