
कराड (हॅलो न्यूज) :- तांबवे येथील उद्योजक सचिन पवार, संदिप पवार यांच्याकडून ना नफा ना तोटा या तत्वावर रूग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गणेश विसर्जना निमित्त तांबवे येथील कोयना पूलाजवळ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सचिन पवार आणि संदिप पवार या दोन बंधूनी गणपती विसर्जनानिमित्त आयोजित महाप्रसादाला मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजता महाप्रसाद वाटपास सुरूवात करण्यात आली. तब्बल 10 हजारांहून अधिक गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी 7 वाजता राज्याचे पर्यटनमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थित गणेश भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कराड व पाटण तालुक्यातील डोंगरी विभागात रस्ते पोहचले असले तरी रूग्णांना लवकरात लवकर पोहचण्यासाठी रूग्णवाहिका वरदायिनी ठरत आहेत. ग्रामीण भागातील लोकांना कमी खर्चात रूग्णवाहिका उपलब्ध करून एस पी ग्रुप आणि सचिन पवार यांनी सामाजिक काम केले आहे. प्रत्येक माणसाचा जीव त्याच्या कुटुंबियासाठी अत्यंत महत्वाचा असतो, तेव्हा अडचणीच्या काळात आधार देण्यासाठी ही रूग्णवाहिका बहुमोल कार्य करेल, असा मला विश्वास आहे.




