श्री क्षेत्र हेळगावचा महागणपती : 162 वर्षांची ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा

गणपती बाप्पा मोरया… महागणपती विशेष
(संदीप पारवे, मसूर)
पडिले हे रुढी जगा परिचारा । करिती व्यवहार सत्य म्हणोनि ।।
संत तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे समाज अनेक जुन्या परंपरांना धर्माचे स्वरूप देऊन पाळत असतो. परंतु, या परंपरा केवळ रीतीरिवाज नसून ते संस्कृतीचे आणि एकतेचे प्रतीक असतात. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या उत्तरेकडील टोकावर, निसर्गाच्या कुशीत वसलेले हेळगाव हे याचे उत्तम उदाहरण आहे. पूर्वेला महादेवाचे पठार, दक्षिणेला थोराबाचा डोंगर, उत्तरेला पिराचा डोंगर आणि पश्चिमेला वाहणारी पावन कृष्णा नदी अशा निसर्गरम्य परिसरात वसलेले हे सुमारे चार हजार लोकवस्तीचे गाव. आरोग्यमय सामाजिक भान जपत आणि तरुणांच्या पुढाकाराने आपल्या १६२ वर्षांच्या गणेशोत्सव परंपरेचा वारसा हेळगाव ग्रामस्थ अत्यंत श्रद्धेने जपत आहेत.
शिवकालीन मंदिरात गणेशोत्सवाची सुरुवात
हेळगाव येथील गणेशोत्सवाची प्रथा ब्रिटिश राजवटीपासून, म्हणजेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून चालत आली आहे. गावाला मोठी धार्मिक परंपरा लाभली असून, येथील एकादशी जागराला १०० वर्षे तर पारायण सोहळ्यास ५० वर्षे पूर्ण झाली आहेत.
गणेशोत्सवाची सुरुवात सुमारे १६२ वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीच्या काळात गोपाळ गणेश कुलकर्णी आणि गावातील १२ बैती (बारा बलुतेदार) एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत असत. वर्गणी म्हणून घरोघरी जाऊन ‘शेरभर ज्वारी आणि चार आणे’ गोळा केले जात असत. गावातील प्राचीन शिवकालीन मंदिरातच श्री गणेशाची स्थापना करण्याची प्रथा सुरू झाली. आज सर्व भाविकांच्या देणगीतून आणि सहकार्यातून या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार झाला आहे. प्रशस्त सभामंडप, रंगरंगोटी आणि नयनरम्य विद्युत रोषणाईमुळे हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र न राहता सामाजिक व विवाह सोहळ्यांचे प्रमुख ठिकाण बनले आहे.

अखंड हरिनाम सप्ताह अन् सांस्कृतिक वैभव
पूर्वी श्रावण महिन्यात होणारा अखंड हरिनाम सप्ताह आता महागणपतीवरील वाढत्या श्रद्धेपोटी गणेशोत्सव काळातच आयोजित केला जातो. गणेशोत्सवाच्या दिवसांत मंदिरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद आणि आरतीचे आयोजन केले जाते. शेवटच्या दोन दिवसांत भाविकांची अलोट गर्दी असते.

तमाशा कलावंतांची अनोखी श्रद्धा
हेळगावच्या महागणपती यात्रेचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘तमाशाची सुपारी’. अशी लोकश्रद्धा आहे की, हेळगावच्या गणेश यात्रेची तमाशाची सुपारी ज्या मंडळाला मिळते, त्यांचा संपूर्ण वर्षाचा सीझन अत्यंत यशस्वी आणि लाभदायक जातो. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी होणाऱ्या बैठकीला परिसरातील अनेक तमाशा मंडळे आवर्जून उपस्थित राहतात. जुन्या काळात केवळ ज्वारी, गहू आणि तांदूळ यांसारख्या धान्याच्या मोबदल्यात तमाशाचे खेळ सादर केले जात असत.
विशिष्ट विसर्जन परंपरा आणि भव्य यात्रा
सामान्यतः अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन केले जाते, परंतु हेळगावच्या महागणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीनंतरच्या चौथ्या दिवशी (भाद्रपद कृष्ण द्वितीयेला) होते.
पारावरील सोहळा: विसर्जन प्रथेनुसार, पहाटे ४ वाजता श्रींची मूर्ती रथात बसवून ग्रामपंचायतीसमोरील पारावर आणली जाते. तेथे तमाशाची ‘गणगवळण’ सादर केली जाते. स्थानिक श्रद्धेनुसार, गणगवळण ऐकल्याशिवाय महागणपती तिथून हलतच नाही! त्यानंतरच विसर्जन मिरवणुकीला दिमाखात प्रारंभ होतो.
वार्षिक यात्रा: ऐन पावसाळ्यात यात्रा असूनही आजवर पावसाने यात कधीही व्यत्यय आणलेला नाही. यात्रेदरम्यान दुकाने, लहान मुलांचे पाळणे, श्री दत्त ग्रामविकास मंडळ, भारतमाता गणेश मंडळ व यात्रा कमिटीतर्फे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यात्रेच्या मुख्य दिवशी भरणाऱ्या ‘कुस्त्यांच्या फडा’त नामवंत पहिलवान हजेरी लावतात.
योग्य नियोजनातून विकसित झालेले हे देवस्थान केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून, संस्कृती, लोककला आणि सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा हेळगावचा हा महागणपती आज द्विशतकाकडे यशस्वी वाटचाल करत असून, पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे परम श्रद्धास्थान बनला आहे.



