Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

Accident News : उत्तर कोपर्डे रेल्वे गेटजवळ स्विफ्ट २० फूट खड्ड्यात कोसळली, तीन वेळा पलटी

एअरबॅग उघडल्याने कारमधील पाच जण सुखरूप

यशवंतनगर (हॅलो न्यूज)- फलटणहून कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या स्विफ्ट कारचा कराड तालुक्यातील उत्तर कोपर्डे आणि कोपर्डे गावच्या हद्दीवर असलेल्या रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळ अपघात झाला. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अंधारात एस आकाराच्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्या लगतच्या सुमारे २० फूट खोल खड्ड्यात कोसळून तीन वेळा पलटी झाली. सुदैवाने कारच्या एअरबॅग उघडल्याने चालकासह कारमधील पाचही प्रवासी गंभीर दुर्घटनेतून सुखरूप बचावले.

एमएच ११ सीक्यू ९३८१ क्रमांकाची स्विफ्ट कार फलटणहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती. अपघाताची तीव्रता पाहता कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. मात्र, अपघाताच्या वेळी कारच्या एअरबॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली. कारमधील पाचही जण सुखरूप बचावल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळील या धोकादायक वळणावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याच्या स्थितीचा अंदाज येण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तीव्र वळणाची पूर्वसूचना देणारे दिशादर्शक फलक, सुरक्षा रेलिंग तसेच वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसविण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मोठी दुर्घटना टळली; सुरक्षा उपायांची गरज
रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळील धोकादायक वळणावर यापूर्वीही अपघाताचा धोका निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पहाटेच्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने स्विफ्ट कार २० फूट खड्ड्यात कोसळली. सुदैवाने एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले. मात्र, भविष्यातील गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिशादर्शक फलक, सुरक्षा रेलिंग व गतिरोधकाची तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

“रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळील वळण अत्यंत धोकादायक आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी अंधारामुळे वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नाही. या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने दिशादर्शक फलक, सुरक्षा कठडे आणि गतिरोधक बसवून तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. आजच्या अपघातात सुदैवाने पाच जणांचे प्राण वाचले; मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते.”
— सुरज चव्हाण, ग्रामस्थ, उत्तर कोपर्डे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close