तांबवेत बैलगाडी शर्यतीत जिवंत बोकड आणि 66 हजार 666 रूपयांचा मानकरी बकासुर बैल
कराड | तांबवे (ता. कराड) येथील श्री. तांबजाई देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीत बकासुर आणि सुंदर बैल जोडीने पहिला क्रमांक मिळवत जिवंत बोकड आणि 66 हजार 666 रूपयांची रोख रक्कमेचे बक्षीस पटकावले. या शर्यती पाहण्यासाठी लोकांनी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी केली होती.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य व रयत कारखान्याचे संचालक प्रदीप पाटील, युवा उद्योजक सुनील बामणे, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील, तात्यासो पाटील, महादेव पाटील, प्रशांत पाटील, सचिन पवार, जावेद मुल्ला, दिलीप पाटील, सुरज पाटील, विक्रम पाटील, चेतन शिंदे, नितीन पवार, नितीन फल्ले, हर्षल पाटील यांच्यासह यात्रा कमेटी व विविध गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तांबवे गावचे ग्रामदैवत असलेल्या तांबजाई व महादेव यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती संपन्न झाल्या. शनिवार व रविवारी यात्रा होत असून मनोरंजनाचे व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . यात्रेनिमित्त आयोजित ओपन बैलगाडा मैदानात पुणे- कात्रज येथील मोहील शेख- धुमाळ आणि वैभव साळुंखे- सुतगाव यांचा बकासुर व हाॅटेल निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या महागंडे यांच्या हिंदकेसरी सुंदर यांनी पहिला क्रमांक पटकावला. जीवन ड्रायव्हर निनाम (जि. सातारा) यांचा हिंदकेसरी पक्ष्या आणि नरसिंगपूर (जि. सांगली) यांच्या अंजीर या बैलजोडीने दुसऱ्या क्रमांकाचे 55 हजार 555 रूपये, गाैतम शहाजी काकडे (निंबूत- बारामती) यांचा वजीर आणि पाली बुद्रुक येथील सुंदर बैलाने तिसऱ्या क्रमांकाचे 44 हजार 444 रूपये, कराड तालुक्यातील सैदापूर येथील धनाजी शिंदे यांच्या वश्या आणि जब्या जोडीने चतुर्थ क्रमांकाचे 33 हजार 333 रूपये, महेश माने (चरेगांव) यांचा स्वामी आणि वासरू बैल जोडीने पाचव्या क्रमांकाचे 22 हजार 222 रूपये तर रेठरे येथील पै. आनंदराव मोहिते यांच्या पाखऱ्या आणि म्हल्हार बैलजोडीने 11 हजार 111 रूपयांचे सहावे बक्षीस पटकावले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, ढाल, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देवून गौरविण्यात आले.
शर्यतीसाठी 125 हून बैलगाड्यांनी सहभाग घेतला. शर्यतीचा निकाल ड्रोन शूट तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीन लावल्याने पारदर्शकता पहायला मिळाली. शर्यती पाहण्यासाठी मैदानावर दोन्ही बाजूला ट्रॉली उभ्या केल्याने प्रेक्षक सुरक्षित असल्याचे दिसून आले. यात्रा कमेटीच्या नेटक्या नियोजनामुळे शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या.
बकासुरचा तांबवे गावात फेरफटका
तांबवे येथे शर्यतीत पहिला क्रमांक बकासुर बैलाने पटकावला. त्यानंतर ग्रामदैवत तांबजाई व महादेव देवाच्या मंदिरात बैलाला नेण्यात आले. यावेळी गावात बकासुरला पाहण्यासाठी व पूजनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.